नवी दिल्ली : नव्या संसद इमारतीमध्ये कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यात लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी महिला आरक्षण विधेयकाला (Women Reservation) काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा होत आहे. त्यामध्ये सोनिया गांधी यांनी पाठिंबा देत म्हटलं की, ‘महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पक्ष पाठिंबा देत आहे. मी या विधेयकाच्या समर्थनार्थ उभी आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच महिलांचा सहभाग सुनिश्चित करणारे विधेयक माझे पती राजीव गांधी यांनीच आणले होते. आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले आहे, ते या विधेयकाच्या मंजूरीमुळे पूर्ण होणार आहे. काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा आहे’.
विधेयक तातडीने मंजूर करावे
हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. पण चिंताही आहे. महिला गेल्या 13 वर्षांपासून राजकीय जबाबदारीची वाट पाहत आहेत. सध्या त्यांना जास्त वेळ थांबायला लावले जात आहे. हे विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, जातीची जनगणना करून एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.