पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर कॉनर होणार पंतप्रधान (फोटो- ani)
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार?
२. मोदी यांच्यानंतर कोण होणार पंतप्रधान?
३. भाजपने अनेकदा स्पष्ट केली भूमिका
नवी दिल्ली: सध्या देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण पंतप्रधान होणार याची चर्चा सुरू आहे. याला कारण म्हणजे भाजपात असलेला ७५ वर्षांचा निवृत्तीचा नियम. हा नियम मोदींना लागू होणार की नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यातच आता एका सर्व्हेने राजकीय विश्वात नवीनच चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर पक्षातही कोणत्या नेत्यांना पंतप्रधान पदासाठी पसंती मिळाली आहे, हे जाणून घेऊयात.
यंदाच्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पक्षाचा नियम पाळून मोदी निवृत्त होणार की, आपला कार्यकाळ सुरूच ठेवणार असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी ७५ वर्षे पूर्ण झाली तरी आपला कार्यकाळ सुरूच ठेवतील आणि २०२९ मध्ये देखील मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र आता समोर आलेल्या सर्व्हेने नवीन चर्चेला वाव मिळाला आहे.
जर का मोदींनी ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्ती घेतली तर, पुढील पंतप्रधान कोण असणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकांनी अनेक नावे सुचवली. मात्र याबाबतच आता इंडिया टुडे सी वोटर या संस्थेने एक सर्व्हे केला आहे. त्यामधून कोणाला पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती मिळाली आहे ते, जाणून घेऊयात.
या सर्व्हेमधून जनतेने अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये सर्वाधिक पसंती ही अमित शहा यांना दिली आहे. तब्बल २८ टक्के जनतेने मोदी यांच्यानंतर पुढील पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पसंती दिली आहे.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना देखील जनतेने पसंती दिली आहे. २६ टक्के जनतेने योगी आदित्यनाथ यांना मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पसंती दर्शवली आहे. नितीन गडकरींना 7 टक्के जनतेने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पसंती दिली आहे. त्यामुळे समोर आलेल्या सर्व्हेनुसार तरी मोदी यांच्यानंतर अमित शहा हेच जनतेच्या मनातील पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार असावेत असे चित्र दिसून येत आहे.