BCCI celebrated Mohinder Amarnath’s birthday : 1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर कपिल देव यांनी ट्रॉफी हातात घेतल्याचे ते ऐतिहासिक चित्र त्या काळातील क्रिकेटप्रेमी अजूनही विसरू शकत नाहीत. कर्णधार कपिल देवच्या शेजारी शॅम्पेन धरून उभा असलेला खेळाडू सर्वांना आठवत असेल. तो दुसरा-तिसरा कोणी नसून हेच त्या काळातले जिमी उर्फ मोहिंदर अमरनाथ होय. आज त्यांचा 74 वा वाढदिवस आहे. 1983 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत सामनावीर ठरलेला मोहिंदर अमरनाथ हा लढाऊ खेळाडू होता. वडिलांकडून मिळालेला क्रिकेटचा वारसा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेला. आज बीसीसीआयने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बीसीसीआयकडून मोहिंदर अमरनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा
154 intl. matches
6,302 intl. runs & 78 intl. wickets 👌
1983 World Cup-winner 🏆 Here's wishing Mohinder Amarnath ji a very Happy Birthday 🎂👏#TeamIndia pic.twitter.com/LcQBrjbrGZ — BCCI (@BCCI) September 24, 2024
जबड्याला सहा टाके पडूनही केली फलंदाजी
1983 च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग आणि अँडी रॉबर्ट्स या त्रिकुटाने भारतीय फलंदाजी लाटून टाकली होती. दुसऱ्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या अमरनाथला चौथ्या कसोटीत मोठा अपघात झाला. त्याने पहिल्या डावात 91 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात मायकल होल्डिंगचा एक शाॅट पिच चेंडू थेट अमरनाथ यांच्या हनुवटीवर आदळला आणि तो जमिनीवर पडला. रक्तस्त्राव झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याच्या जबड्याला सहा टाके पडले आणि काही वेळाने तो फलंदाजीसाठी खेळपट्टीवर पोहोचला. 18 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि 80 धावा करूनच माघारी परतला.
वडील आणि भाऊही भारताकडून खेळले
‘जिमी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या मोहिंदरच्या रक्तात क्रिकेट होते. त्यांचे वडील लाला अमरनाथ आणि भाऊ सुरिंदर अमरनाथ हे देखील क्रिकेटपटू होते. विशेषत: लाला अमरनाथ यांना भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही ओळखीची गरज नाही. तर मोहिंदर हा एक अप्रतिम आणि लढाऊ खेळाडू होता, ज्याच्यावर संपूर्ण संघाचा विश्वास होता. 1970 आणि 1980 च्या दशकात तो भारतीय बॅटिंग लाइनअपची ताकद होता. फलंदाजीसोबतच तो गोलंदाजीतही निष्णात होता.
भारतासाठी हा विक्रम ठरला
मोहिंदरने 1969 मध्ये वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून पदार्पण केले, परंतु त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर तो नेहमीच उच्च फळीतील फलंदाज म्हणून ओळखला गेला. तथापि, तो गोलंदाजी करण्यातही निपुण होता आणि त्याच्याकडे मोठ्या कौशल्याने आणि नियंत्रणासह चेंडू स्विंग आणि कट करण्याची क्षमता होती. त्याच्या नावावर 69 कसोटी सामन्यांमध्ये 4,378 धावा आहेत ज्यात 11 शतके आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 55.68 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत. 85 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 30.53 च्या सरासरीने 1924 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या (नाबाद 102 धावा) आहे. त्याने 42.84 धावांच्या सरासरीने 46 विकेट्सही घेतल्या.






