मुंबईच्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह असणार बाहेर; काय आहे नेमकं कारण; जाणून घ्या सविस्तर
IND vs NZ Playing XI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून तिसरी कसोटी खेळली जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. त्याचवेळी, याआधी भारतीय प्लेइंग इलेव्हनशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
WTC च्या दृष्टीने तिसरी कसोटी अत्यंत महत्त्वाची
त्याचबरोबर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझीलंडने पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला. अशाप्रकारे किवी संघ मालिकेत 2-0 ने पुढे आहे. भारतीय संघ तिसरी कसोटी जिंकून क्लीन स्वीप टाळू इच्छितो. याशिवाय भारताने मालिका गमावली असली तरी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेच्या दृष्टीने तिसरी कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ पराभूत झाला, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले जाऊ शकते.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. ही मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान उभय संघांमधील पहिली कसोटी खेळवली जाणार आहे. यानंतर ६ डिसेंबरपासून दोन्ही संघ आमनेसामने येतील. तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवली जाणार आहे.