मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- ट्विटर)
वाचनालये, अभ्यासिका, जिम,उद्याने आणि मनोरंजक केंद्र उभारणार
उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
मोकळ्या जमिनींवर अनधिकृत बांधकामामुळे समस्या
मुंबई: एकीकडे मुंबईत मोकळी जागा शिल्लक नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे, तर दुसरीकडे सरकारी मोकळ्या जमिनींवर अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण ही होत आहेत. या स्थितीत अनधिकृत बांधकामाला प्रतिबंध करणे महत्वाचे असून मुंबईतील ५०० एकर जमिनींचा ताबा घेऊन जनतेसाठी त्या जमिनींचा वापर करणार असल्याचे मुंबई उपनगरचे सह पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई उपनगरातील अतिक्रमित जमीन सरकारच्या ताब्यात घेण्यासंदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलते होते.
मुंबई शहरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनींवर आणि कांदळवनावर अतिक्रमण होत आहे. प्रामुख्याने शासनाच्या मोकळ्या जमिनींवर हे अतिक्रमण होत असून याला आळा घालणे गरजेचे झाले आहे. मालाड – मालवणी परिसरात अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कडक कारवाई सुरु असून पहिल्या टप्प्यात ९ हजार वर्ग मीटर जमीन प्रशासनाने अतिक्रमणमुक्त केली आहे. मात्र मोकळ्या झालेल्या या जमिनीवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले असून त्या जमिनींचा लवकरात लवकर ताबा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले. तसेच मुंबई तल्या मानखुर्द, कुर्ला, गोवंडी या भागातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे. त्या ठिकाणीही अधिकार्यांनी सरकारी जमिनींवरील अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम उभारावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मुंबई शहर आणि उपनगर मिळून प्रथम दर्शनी हजारो एकर जमिनींवर अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने मुंबईकरांना प्राथमिक सुविधा देणेही प्रशासनाला अतिशय अवघड जात आहे. मात्र सध्या मोकळ्या असलेल्या जमिनी वाचवणे क्रमप्राप्त असल्याचेही ते म्हणाले. पहिल्यांदा मुंबई परिसरातील ५०० एकर मोकळ्या जमिनींची नोंद घेऊन त्यावर सेवाभावी आणि सामाजिक संस्थांना विधायक उपक्रम राबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्या जमिनींवर क्रीडांगण, वाचनालय, व्यायामशाळा,अभ्यासिका या सारखे उपक्रम राबवता येतील.त्यामुळे शहरातल्या मोकळ्या जमिनी सुरक्षित राहतील,असेही मंत्री लोढा म्हणाले.
अतिक्रमणमुक्त मुंबईसाठी एक महत्त्वाचे पाऊल मुंबई शहर आणि उपनगरातील हजारो एकर सरकारी जमिनींवर अतिक्रमण झालेले आहे. हा पॅटर्न रोखायलाच हवा आणि आपली शहरं वाचवायलाच हवीत. त्यासाठीच मुंबई उपनगर जिल्ह्याचा सहपालकमंत्री या नात्याने पुढील वर्षात मुंबईतील ५०० एकर सरकारी जमिनी… pic.twitter.com/luZuVgqJrU — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 26, 2025
या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सध्या मालाड आणि मालवणी परिसरात सुरु असलेल्या अतिक्रमण विरोधातील पहिल्या टप्प्यातील कारवाईची माहितीही यावेळी दिली. या परिसरात २८ अंगणवाड्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी मांस विक्री, पानटपरी, अन्य व्यवसायासह अनधिकृत बांधकाम करून त्या जागेचा कब्जा घेतला होता. त्या ठिकाणी कारवाई होत असताना कब्जा घेतलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश ही मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.
MLA अस्लम शेखांविरुद्ध नागरिक एकवटणार; बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात मालवणीत मोर्चा
मालाड मालवणी परिसरात स्थानिक आमदाराचा वरदहस्त असल्याने मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे अवैध रित्या राहत असल्याचे निदर्शनाला आले आहे. अवैध आधारकार्ड ,रेशनिंग कार्ड वापरून ते घुसखोर मतदार यादीत नोंदणी करत आहेत. या भागात गेल्या दहा वर्षात मतदारांची संख्या दुपटीने वाढली असल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. या घुसखोरीमुळे मुंबईच्या सुरक्षेला बाधा पोहचत असून त्यावर कठोर कारवाई करावी,असेही निर्देश मंत्री लोढा यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, मुंबई उपनगरातील मोकळ्या जमिनींची वर्गवारी करून त्या ठिकाणी लवकरात लवकर विधायक उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने प्रशासन कार्यवाही करेल असे यावेळी उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले. तसेच सरकारी जमिनीवर कब्जा केलेल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील असेही पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी सांगितले.






