(फोटो सौजन्य – Pinterest)
उन्हळ्यात अनेकजण फिरण्याचा प्लॅन करत असतात. यावेळी बहुतेक लोकांचा बीच किंवा थंड ठिकाणी भेट देण्याचा कल जास्त असतो. त्याचवेळी काही लोक नैसर्गिक ठिकाणांनाही भेट देत असतात. सध्या देशात वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वन्य प्राण्यांची आवड असणारी लोक जंगल सफारीचा प्लॅन करत असतात. इथले घनदाट जंगले आणि उत्कृष्ट आलिशान रिसॉर्ट्स पर्यटकांना आकर्षित करतात. अशात आज आम्ही तुम्हाला देशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याचा सल्ला देतो.
पन्नाला येऊन तुम्ही सफारी राईडवर जाऊ शकता. मुख्य म्हणजे इथे एक पांडव गुहा आणि धबधबा देखील आहे, जे एक रहस्यमय ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी असून हे ठिकाण पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात वसलेले एक सुंदर ठिकाण आहे. इथे तुम्हाला ठिकाण नैसर्गिक, ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता येईल. इथे एक सुंदर धबधबा आहे जो पांडव धबधबा नावाने प्रचलित आहे. पांडव धबधब्याची उंची ३० मीटर आहे. पावसाळ्यात येथील दृश्य खूपच नयनरम्य असते. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून हे क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. येथे अनेक औषधी वनस्पती आढळतात. जे मानवी जीवनासाठी खूप महत्वाचे आहे.
पांडव धबधब्याचे पाणी मध्य प्रदेशातील केन नदीच्या उपनदीतून येते. हा एक बारमाही धबधबा आहे, पावसाळ्यात धबधब्याचा वेग वाढतो. पांडव धबधब्याचे पाणी खाली असलेल्या एका मोठ्या तलावात पडते, तलावाचा आकार हृदयासारखा दिसतो. इथल्या तलावाचे पाणी इतके स्पष्ट आहे की या पाण्यात तरंगणारे मासे स्पष्ट दिसून येतात. पांडव धबधबा हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आहे. पांडव गुहा आणि पांडव धबधब्याची शांतता, पावित्र्य आणि नयनरम्य वातावरण लोकांना आणखीनच सुखावून जाते. शांत पर्यटनासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
पांडव धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
पांडव धबधबा हे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात स्थित सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जिथे जगभरातील पर्यटक भेट देतात. पांडव धबधब्याला भेट देण्यासाठी हिवाळा आणि पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो कारण या काळात हा परिसर दाट हिरवळीने भरलेला असतो आणि पाण्याचा प्रवाह चांगला असतो.
पौराणिक कथा काय सांगते?
जुगारात पराभूत झाल्यानंतर पांडवांना हस्तिनापूरमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर अज्ञातरूपात पांडव या गुफेत राहत होते जी आज पांडव गुहेच्या नावाने ओळखली जाते. त्यांनी धबधब्याच्या जवळील एका गुहेत आश्रय घेतला आणि त्यांची शस्त्रे ठेवली. या घटनेनंतर त्याचे नाव पांडव धबधबा आणि पांडव गुहा असे ठेवण्यात आले. आजही अनेक पर्यटक ही गुहा, धबधबा आणि त्यांचे अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी इथे येतात.