मुंबई : राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, भाजपमध्ये (BJP) कॉंग्रेसमधील (Congress) अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होत आहे. आज कॉंग्रेससोबत 40 वर्षे काम केलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan in BJP) यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आता महाविकास आघाडीमधील (MVA) नेत्यांनी देखील बैठकांचे सत्र सुरु केले असून जागावाटप फॉर्मुला ठरवला जात आहे. यासाठी मविआमधील घटक पक्षांची बैठक झाली. यानंतर कॉंग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली.
कॉंग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले की, – महाराष्ट्र प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदा शरद पवारांना भेटलो. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह कॉंग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी देखील आम्ही बोललो. आजच्या दोन तासांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून शरद पवारांशी जागावाटपावर बोललो आहोत. तसेच उद्धव ठाकरेंशी देखील चर्चा झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहेत. येत्या काही दिवसांत महाविकास आघाडीचा कार्यक्रम चालू होईल अशी माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांसाठी भाजप जोरदार तयारीला लागला आहे. राजकारणातील अनेक मुरलेले नेते भाजपची वाट धरत आहेत. यामुळे महाविकास आघाडीला देखील मोठा धक्का बसत असून मविआचे बैठकसत्र अजून सुरु आहे. लोकसभा निवडणूकीसाठी देशपातळीवर तयार करण्यात आलेल्या इंडिया आघाडीमध्ये देखील बिघाडी झालेली आहे. यामुळे विरोधकांच्या या बैठकांकडे आणि जागावाटप फॉर्मुल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली असून लवकरच महा विकास आघाडीचा कार्यक्रम सुरु होईल अशी माहिती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.