‘नेट झिरो’ परिषद' (फोटो- सोशल मीडिया)
हवामान बदलावर मात करण्यासाठी सामूहिक कृतीची गरज : सुरेश प्रभू
इंटरनॅशनल रोटरी इंडियाची ‘नेट झिरो’ परिषद पुण्यात उत्साहात संपन्न
खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले परिषदेचे उद्घाटन
पुणे: हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ ही मानवतेसमोरील सर्वात मोठी आव्हाने असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर सामूहिक प्रयत्न आणि पर्यावरणीय करारांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. इंटरनॅशनल रोटरी इंडिया आयोजित ‘नेट झिरो’ विषयावरील (Pune News) परिषद हर्षल हॉल, कर्वे रोड येथे उत्साहात पार पडली. परिषदेचे उद्घाटन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
यावेळी रोटरी ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, जिल्हा संचालक (पर्यावरण) राजेंद्रकुमार सराफ, डॉ. रामचंद्र भारद्वाज, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके (आयपीएस), अरविंद मिठसागर यांच्यासह रोटरीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश प्रभू यांनी वाढत्या तापमानामुळे शेती, उद्योग आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. पूर, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींची वाढ ही हवामान बदलाची गंभीर चिन्हे असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक देश अजूनही या प्रश्नाकडे आवश्यक गांभीर्याने पाहत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी जागतिक सामंजस्य करारांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
आरे परिसरात समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे जंगल निर्माण करणार; आशिष शेलार
डॉ . मेधा कुलकर्णी यांनी भारताने अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे या माध्यमातून २०५० पर्यंत नेट झिरोचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा कार्बन कमी करण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेचे आयोजन नेट झिरोच्या जागतिक मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आल्याचे राजेंद्रकुमार सराफ यांनी सांगितले. यावेळी आनंद चोरडिया यांना ‘सेवा श्रेष्ठ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘नेट झिरो अनुप्रयोग’ विषयावरील चर्चासत्रात डॉ. पूर्वा केसकर, डॉ. प्रियदर्शनी कर्वे, संदीप सोनिगरा, नम्रता धामणकर, श्यामला देसाई यांनी सहभाग नोंदविला. परिषदेत रोटरीच्या ‘ग्रीन वीक मिशन’ अंतर्गत कार्बन, पाणी आणि कचऱ्याचा फूटप्रिंट कमी करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरी जोशी यांनी केले, तर अरविंद मिठसागर व निलेश धोपाडे यांनी आभार मानले.






