आरे परिसरात जंगल निर्माण करणार, मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही
यावेळी आमदार मुरजी पटेल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेच्या अनुषंगाने ॲड. शेलार यांनी आरे कॅम्प, मेट्रो कारशेड परिसरातील रिक्त जागा, मेट्रो भवनाच्या राखीव जागा, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ परिसर, कृषी उद्योग विकास महामंडळ, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, फोर्स वन, महानंद डेअरी; तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या अहवालानुसार या विविध ठिकाणी मिळून सुमारे ८० एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही मोहीम केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी नमूद केले. या मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीआयएस आधारित नियोजन, डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली आणि वृक्षसंवर्धनासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक वृक्षाची वाढ, त्याचे संवर्धन आणि टिकाव यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
याशिवाय पारंपरिक वृक्षारोपण पद्धतीसोबतच घनदाट, स्वयंपोषक आणि जैवविविधतेने समृद्ध शहरी जंगले निर्माण करण्यासाठी मियावाकी पद्धतीचाही अवलंब करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधत मुंबई उपनगराला अधिक हिरवे, अधिक सुंदर आणि अधिक पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प यामागे असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली






