पुन्हा एकदा थर्ड अंपायरचा चुकीचा निर्णय, वॉशिंग्टन सुंदरबरोबर अन्याय, पाहा VIDEO
Washington Sundar Wicket : सिडनी कसोटीत अंपायरिंगवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन कॅम्पने विराट कोहलीला नाबाद दिल्याबद्दल आक्षेप घेतला होता. आता भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला आऊट देण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. यानंतर भारतीय चाहत्यांनी जोरात अंपायरला शिवीगाळ केली. चाहत्यांना सुंदरची विकेट पचनी पडू शकली नाही आणि वादग्रस्त निर्णयाचा राग आला आणि त्यांनी गोंधळ घातला. यापूर्वी मेलबर्नमध्ये यशस्वी जयस्वालच्या विकेटवर असाच गोंधळ पाहायला मिळाला होता.
कमिन्सने घेतली वॉशिंग्टन सुंदरची विकेट
टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये कठीण काळात वॉशिंग्टन सुंदरची संघाची नितांत गरज होती, पण अशा वेळी सुंदर एका वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या चेंडूवर सुंदरला यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने झेलबाद केले. या डावात सुंदर 30 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 14 धावा करून बाद झाला.
पुन्हा एकदा वॉशिंग्टन सुंदरचा चुकीचा निर्णय
🧐 #Bumrah not pleased with #WashingtonSundar's wicket, frustrated by Snicko's decision 🫣#AUSvINDOnStar 👉 5th Test, Day 2 | SAT, 4th JAN, 5 AM | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/8WKRYjy8j1
— Star Sports (@StarSportsIndia) January 3, 2025
इंग्लड क्रिकेटर मायकेल वॉननेसुद्धा व्यक्त केले आश्चर्य
वॉशिंग्टन सुंदरला मैदानी पंचाने नाबाद दिले होते. मात्र, जेव्हा हे प्रकरण टीव्ही अंपायरपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी निर्णायक पुराव्याशिवाय सुंदरला आऊट दिले. यानंतर पुन्हा एकदा अंपायरिंग आणि तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित होत आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनही या निर्णयावर नाराज दिसला. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, ‘यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. हा एक विचित्र निर्णय आहे.’
यूजर्सकडून नेटवर जोरदार चॅटींग
भारतीय चाहतेही सोशल मीडियावर सुंदरच्या समर्थनार्थ उभे असल्याचे पाहायला मिळाले. एका यूजरने लिहिले की, ‘स्निकोवरील हालचाल सुंदरचा पाय स्टंपजवळ ओढल्यामुळे झाली. तो आवाज चेंडू स्टंपजवळ येण्यापूर्वीच होता.
यापूर्वी जयस्वालच्या विकेटवरून झाला होता गदारोळ
याआधी मेलबर्न कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात युवा फलंदाज यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून गोंधळ झाला होता. जयस्वालही ॲलेक्स कॅरीकरवी विकेटच्या मागे झेलबाद झाला. टीव्ही अंपायरनेही जयस्वालला निर्णायक पुराव्याशिवाय आऊट दिला होता. या निर्णयानंतर भारतीय चाहत्यांनी पंचांवर फसवणूक केल्याचा आरोप केला.