(फोटो सौजन्य: istock
आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आजराने ग्रस्त आहे. अपचनाचा त्रास हा जवळजवळ सर्वांनाच कधी ना कधी उद्भवतो. जेवणानंतर छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा पोटात जडपणा येणे ही अपचनाची लक्षणे आहेत. आम्लपित्त आणि अपचन हे आजच्या धावपळीच्या जीवनात सामान्य झाले आहे. खाण्याच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित दिनचर्या आणि ताणतणाव यामुळे ही समस्या आपल्याला जाणवत असते. अशा परिस्थिती आज आम्ही तुम्हाला काही अशी बियाणे सांगणार आहोत ज्यांचे नियमित सेवन करून तुम्ही पचनासंबंधित सर्व समस्यांपासून स्वतःची सुटका करू शकता. चला या कोणत्या बिया आहेत आणि त्यांचा आरोग्याला कोणता फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
चिया सीड्स
या बिया लहान असल्या तरी पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहेत. चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पाणी शोषून घेते आणि जेल बनवते. हे जेल पचनसंस्थेत एक गुळगुळीत थर तयार करते, ज्यामुळे अन्न सहजतेने हलण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. फायबरमुळे पोट भरलेले वाटते, जे तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखते. म्हणून, पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी चिया बियांचा आहारात समावेश करावा. तुम्ही रात्रभर चिया सीड्सना पाण्यात भिजवून मग सकाळी त्यांचे सेवन करू शकता अथवा स्मूदी किंवा दह्यात मिसळून देखील याला खाता येते.
फ्लॅक्स सीड्स
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ओमेगा-३ जळजळ कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे आम्लता आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारख्या पाचन समस्यांमध्ये आराम मिळतो. त्यातील फायबर पचनक्रिया सुरळीत करते. आता याचे सेवन कसे करावे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही या बिया भाजून याची पावडर तयार करू शकता आणि मग ही पावडर सॅलड, दही अथवा इतर भाज्यांमध्ये ॲड करून याचे सेवन केले जाऊ शकते.
बडीशेप
अनेकदा जेवणानंतर बडीशेपचे सेवन केले जाते. हे फक्त तोंडाला ताजेतवाने देण्यासाठी फायदेशीर नाही तर पचनासाठीही देखील एक उत्तम औषधी पर्याय आहे. यामध्ये असलेले अॅनेथोल नावाचे एंजाइम पाचन एंजाइम सक्रिय करते, ज्यामुळे अन्न पचायला मदत होते. बडीशेपमध्ये थंडावा असतो, जो आम्लपित्त आणि पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करतो. म्हणूनच जेवणानंतर बडीशेप चावणे फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर त्याचा चहा पिऊन आहारात याचा समावेश करू शकता.
हाताचे तापमान उलगडत असते तुमच्या आतड्यांच्या आरोग्याचे रहस्य; जाणून घ्या काय सांगत आहे गट हेल्थ
जिरे
जिरे केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर ते पचनासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे गॅस आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करते. पाण्यात भिजवलेले जिरे पिल्याने किंवा जिरे पावडर खाल्ल्याने पचनक्रिया वाढते आणि पोट हलके वाटते. अशा परिस्थितीत, अर्धा चमचा जिरे एका ग्लास पाण्यात उकळवा आणि नंतर ते थंड करून गाळून प्या. याशिवाय, जेवणात जिरे वापरल्याने पचनक्रियाही चांगली राहते.
मेथी दाणे
मेथीचे दाणे चवीला कडू असले तरी यात अनेक औषधी गुणधर्म असतात जे पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यास आपली मदत करतात. त्यात म्युसिलेज नावाचे सक्रिय घटक असते जे पोटाच्या आतील आवरणाला शांत करते आणि आम्लपित्त कमी करते. यासोबतच, ते बद्धकोष्ठता आणि पोटफुगी देखील कमी करते. म्हणून, रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. बिया चावून चावून त्यांचे सेवन करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.