फणस खाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणात आंबे, फणस, काजू इत्यादी अनेक फळे उपलब्ध असतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे फणस. चवीला गोड आणि रसाळ फणस सगळ्यांचं खायला खूप आवडतो. फणसाचे देखील दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कापा फणस, दुसरा रसाळ फणस. पण आवडीने खाल्ला जाणारा फणस चुकीच्या पद्धतीने खाल्यास शरीराच्या पचनक्रियावर गंभीर परिणाम करतो. यामुळे अपचन, गॅस, मळमळ इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बऱ्याचदा घरातील वडीलधारे व्यक्ती फणस खाल्यानंतर पाणी पिऊ नये, असा सल्ला देतात. फणस खाल्यानंतर शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. याशिवाय काहींना लघवीमध्ये जळजळ वाढणे, आतड्यांवर ताण येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फणस खाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
फणस खाल्यानंतर लगेच दही, ताक किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये. कारण फणसामध्ये असलेल्या उष्णतेमुळे आणि दह्यातील थंडाव्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्यामुळे पचनक्रिया बिघडते. याशिवाय यामुळे पोटात गॅस, मळमळ, जडपणा जाणवणे, सर्दी होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थ, बर्फाचे पदार्थ, आईस्क्रीम इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. पण फणस खाल्यानंतर थंड पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. थंड आणि गरम अशा दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला किंवा घशाला त्रास होण्याची शक्यता असते.
फणस खाल्यानंतर चिकन, मटण, मासे इत्यादी मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे आतड्यांवर ताण येण्याची शक्यता असते. पचनसंस्था बिघडून शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय अपचन, उलटी, जळजळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे फणस खाल्यानंतर कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करू नये.
फणस चवीला अतिशय गोड असतो. त्यामुळे फणस खाल्यानंतर लगेच लाडू, बर्फी, गुलाबजाम इत्यादी अतिगोड पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी फणस किंवा अतिसाखरेचे पदार्थ खाऊ नये.