पालकची भाजी खायला आवडत नाही? मग हिरव्यागार पानांपासून घरीच बनवा नॅचरल फेसपॅक
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. पण पालेभाज्या पाहिल्यानंतर मुलं नाक मुरडतात.पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मेथी, पालक, मुळा, चाकवत इत्यादी भाज्यांमध्ये असलेले गुणकारी घटक शरीराला भरपूर पोषण देतात. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. चेहरा काहीवेळा अतिशय निस्तेज आणि वयस्कर वाटू लागतो. याशिवाय चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे त्वचेवर पिंपल्स येणे, मुरूम, बारीक बारीक पुरळ इत्यादी अनेक समस्या चेहऱ्यावर दिसून येतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारातील स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यासोबतच घरगुती उपाय सुद्धा करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पालकच्या पानांचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात पालक टाकून पातळ पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात दही, तांदळाचे पीठ, मध आणि गुलाब पाणी मिक्स करून फेसपॅक बनवा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर होईल. पालकमध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचा उठावदार आणि सुंदर होते.
पालकमध्ये विटामिन ए, सी, ई आणि आयर्न इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन, पिंपल्स कमी होऊन त्वचा अधिक सुंदर दिसते. तसेच यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील थकवा, तणाव दूर करतात. त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी आणि त्वचेवरील टॅन कमी करण्यासाठी पालक फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते.
सर्वच महिला गुलाब पाण्याचा टोनर म्हणून वापर करतात. गुलाब पाण्यामुळे त्वचा कायमच हायड्रेट राहते. याशिवाय गुलाब पाणी लावल्यामुळे त्वचेवरील ताजेपणा कायम टिकून राहतो आणि चेहरा अतिशय सुंदर दिसतो. गुलाब पाणी त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवणे, रोमछिद्र घट्ट करणे इत्यादी गोष्टी करते. त्यामुळे गुलाब पाण्याचा वापर करावा.






