मुंबईतील डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी! ३.५ वर्षांच्या चिमुकल्याच्या मेंदूतील दुर्मिळ ट्यूमर काढून परत मिळवून दिली हरवलेली वाणी
ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालील जमीन सरकते. कारण मेंदूमध्ये झालेल्या गाठी संपूर्ण शरीराला हानी पोहचवतात. याचा थेट मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. मेंदूमध्ये गाठी झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने लक्षणे अधिकच तीव्र होतात. पण मागील काही वर्षांमध्ये झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी उपचार करणे शक्य आहे. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांचा यश येत आहे. अशीच एक उल्लेखनीय कामगिरी मुंबईतील डॉ. राघवेंद्र रामदासी, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, जसलोक हॉस्पिटल यांनी केली आहे. एका ३.५ वर्षांच्या मुलाचा दुर्मिळ मेंदूतील ट्यूमर काढून त्याची हरवलेली वाणी कशी परत मिळवून दिली, ज्यामुळे अनेक वर्षे त्याच्या बोलण्याच्या क्षमतेवर शांतपणे परिणाम होत होता. इंट्राऑपरेटिव्ह इलेक्ट्रोकॉर्टिकोग्राफी (ECoG) शस्त्रक्रियेच्या सहाय्याने ट्यूमर जवळपास संपूर्ण काढून टाकला आहे. यशस्वी उपचारामुळे वैद्यकीय क्षेत्रात आशेचा नवा किरण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.(फोटो सौजन्य – istock)
मुंबईतील हा लहान मुलगा जवळपास तीन वर्षे न्यूरोलॉजिस्ट ज्याला “इलेक्ट्रिकल स्टॉर्म्स” म्हणतात अशा अवस्थेत जगत होता. मेंदूमध्ये वारंवार आणि अनियंत्रितपणे निर्माण होणाऱ्या असामान्य विद्युत क्रियांमुळे त्याला झटके येत होते. हे झटके मुलाला वयाच्या अवघ्या ३.५ महिन्यांपासून सुरू झाले होते. तज्ज्ञांकडे येईपर्यंत त्याला दररोज ६ ते ८ वेळा झटके येत होते. हात-पाय अचानक ताठ होणे, तोंडातून फेस येणे, शून्यात नजर लावून पाहणे आणि त्यानंतर बराच वेळ गोंधळलेल्या अवस्थेत राहणे अशी लक्षणे होती. मात्र कुटुंबाची चिंता फक्त झटक्यांपुरती मर्यादित नव्हती.त्याला आसपासचे सर्व काही समजत होते, पण तो स्वतःचे विचार व्यक्त करू शकत नव्हता. डोळ्यांचा संपर्क कमी होता. सामाजिक संवाद मर्यादित होता. तो मुख्यतः आईशी हातवारे करून संवाद साधत होता. काहींनी हे वर्तनात्मक (Behavioural) समस्या असू शकते असे सुचवले होते, परंतु चित्र काहीतरी वेगळे सांगत होते.
संवादातील अडचण असलेल्या प्रत्येक मुलामागे वर्तनात्मक विकारच असतो असे नाही. कधीकधी त्यामागे उपचार करता येण्यासारखा मेंदूतील विकार असू शकतो. MRI तपासणीत परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झाली. मुलाच्या मेंदूच्या डाव्या टेम्पोरल लोबमध्ये ४ सें.मी. आकाराचा ट्यूमर आढळला. हा भाग भाषा, स्मरणशक्ती, भावना आणि सामाजिक संवाद नियंत्रित करतो.
EEG तपासणीत त्याच भागातून सतत एपिलेप्टिक क्रिया होत असल्याचे दिसून आले. मुलाला दुर्मिळ प्रकारचा बालवयीन लो-ग्रेड ग्लायोमा असल्याचे निदान झाले, जो औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या एपिलेप्सीचे कारण ठरत होता.अनेक अँटी-एपिलेप्टिक औषधे देऊनही झटके थांबत नव्हते. शस्त्रक्रिया न्यूरोसर्जिकल टीमने ट्यूमर काढण्यासोबतच झटके निर्माण करणाऱ्या भागाचे अचूक मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी इंट्राऑपरेटिव्ह इलेक्ट्रोकॉर्टिकोग्राफी (ECoG) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूच्या पृष्ठभागावरील विद्युत क्रिया थेट नोंदवल्या जातात.ट्यूमर मेझियल टेम्पोरल लोब आणि हिप्पोकॅम्पस या मेंदूच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि शस्त्रक्रियेसाठी आव्हानात्मक भागात होता.यशस्वीपणे ट्यूमरचा जवळपास संपूर्ण भाग काढण्यात आला. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर मुलामध्ये कोणतीही नवीन न्यूरोलॉजिकल कमतरता दिसून आली नाही.त्यानंतरच्या हिस्टोपॅथॉलॉजी तपासणीत BRAF-म्युटेटेड डिफ्यूज लो-ग्रेड ग्लायोमा असल्याची पुष्टी झाली. हा MAPK Pathway शी संबंधित आण्विक प्रकार असून बाल न्यूरो-ऑन्कोलॉजीमध्ये त्याला वाढते महत्त्व प्राप्त होत आहे. भविष्यात गरज भासल्यास लक्ष्यित (Targeted) उपचारांचा मार्गही या निदानामुळे उपलब्ध झाला.
हे प्रकरण ऑपरेशन थिएटरच्या मर्यादेपलीकडे जाणारा महत्त्वाचा संदेश देते. वारंवार झटके येणारी, विकासाची गती मंदावलेली, डोळ्यांचा कमी संपर्क असलेली किंवा उशिरा बोलायला लागणारी अनेक मुले प्रथम वर्तनात्मक मूल्यमापनासाठी पाठवली जातात. मात्र या मुलाची कहाणी सांगते की योग्य वेळी केलेली MRI तपासणी निर्णायक ठरू शकते. इंट्राऑपरेटिव्ह ECoG चा वापर हा आधुनिक एपिलेप्सी शस्त्रक्रियेतील सर्वोत्तम पद्धतींपैकी एक मानला जातो. यामुळे झटके निर्माण करणाऱ्या भागाचे अचूक मॅपिंग करता येते आणि भाषेसारख्या महत्त्वाच्या कार्यांचे संरक्षण करत अधिक सुरक्षित शस्त्रक्रिया करता येते.






