का निर्माण होत आहे श्रवण समस्या (फोटो सौजन्य - iStock)
तज्ज्ञांच्या मते, श्रवणशक्ती कमी होणे अनेकदा हळूहळू विकसित होत असल्यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करतात. मोठ्या आवाजाच्या सततच्या संपर्कामुळे कानाच्या आतील नाजूक पेशींवर परिणाम होतो. या पेशी आवाज स्पष्टपणे ऐकू येण्यासाठी महत्त्वाच्या असतात; परंतु वारंवार मोठ्या आवाजाच्या संपर्कामुळे त्या खराब होऊ शकतात.
कानाच्या व्याधींनी त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा
काय सांगतात तज्ज्ञ
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉ. अभिजित मंत्री यांनी सांगितले की, वाहतुकीचा आवाज, बांधकाम यंत्रसामग्री, तसेच उत्सव किंवा कार्यक्रमांदरम्यान लाऊडस्पीकर आणि फटाक्यांच्या वापरामुळे लोक कानांच्या सहनशक्तीपेक्षा जास्त आवाजाच्या पातळीला सामोरे जातात. कालांतराने या सततच्या आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम होऊन श्रवण क्षमता कमी होण्याची समस्या उद्भवू शकते.बऱ्याचदा श्रवणशक्ती अचानक कमी होत नाही, तर ती हळूहळू कमी कमी होत जाते.
अलीकडे श्रवण समस्यांसाठी रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांमध्ये सुमारे ४० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे. विशेषतः २५ ते ७९ वयोगटातील व्यक्तींना गर्दीच्या ठिकाणी संभाषण स्पष्ट ऐकण्यात अडचण येणे, लोकांनी सांगितलेले पुन्हा पुन्हा विचारणे, टीव्ही किंवा मोबाईलचा आवाज वाढवणे, कानात विशिष्ट आवाज किंवा काहीतरी वाजण्याचा आवाज (टिनिटस) येणे, तसेच समोरची व्यक्ती अस्पष्ट बोलत आहे असे वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास उपचारास विलंब होतो आणि समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
कशा आहेत चाचण्या
डॉ. मंत्री पुढे म्हणाले की, श्रवण समस्यांचे निदान ईएनटी तज्ज्ञ किंवा ऑडिओलॉजिस्टद्वारे केलेल्या ऑडिओमेट्रीसारख्या साध्या श्रवण चाचण्यांद्वारे करता येते. वेळीच निदान झाल्यास श्रवणशक्ती कमी होण्याचा प्रकार आणि त्याची तीव्रता ओळखणे सोपे होते. परिस्थितीनुसार उपचारांमध्ये कानाच्या संसर्गासाठी औषधे, श्रवणयंत्रे, स्टिरॉइड थेरपी किंवा इतर सहाय्यक उपचारांचा समावेश केला जाऊ शकतो.
कोणते उपाय करावेत
तज्ज्ञांनी श्रवणसंवर्धनासाठी काही सोप्या उपायांचे पालन करण्याचेही आवाहन केले आहे. यामध्ये उत्सव किंवा कार्यक्रमांदरम्यान लाऊडस्पीकरच्या अगदी जवळ उभे राहणे टाळावे, अतिशय गोंगाटाच्या वातावरणात इअरप्लग किंवा नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्स वापरणे,हेडफोन्स व संगीत उपकरणांचा आवाज सुरक्षित पातळीवर ठेवणे, सतत गोंगाट असलेल्या वातावरणात राहण्याऐवजी मधूनमधून शांत जागी विश्रांती घ्यावी.
तज्ज्ञांच्या मते, ध्वनी प्रदूषण हे शहरी जीवनाचा एक सामान्य वाटत असला तरी त्याचा श्रवण क्षमतेवर होणारा परिणाम दुर्लक्षित करता कामा नये. नियमित श्रवण तपासणी हा सुरुवातीची लक्षणं ओळखण्यास मदत करते. प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास आपली श्रवणशक्ती दीर्घकाळ सुरक्षित ठेवता येते.
सर्दीमुळे सतत कान दुखतो? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, कानाच्या समस्या होतील कायमच्या दूर






