उन्हाळ्यात वाढतोय ‘यूटीआय’चा धोका; लघवी रोखुन धरणे, ओल्या स्विमसूटमध्ये जास्त वेळ वावरल्याने उद्भवतो संसर्ग
पुणे: उन्हाळी सुट्ट्या म्हणजे प्रवास, समु्द्रावर फिरायला जाणे, कुटुंबासोबत मोठी सहल आणि पाण्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद घेणे. मात्र, याकाळात महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) अर्थात मूत्रमार्ग संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली. दीर्घ प्रवासादरम्यान लघवी रोखून धरणे, बराच वेळ ओल्या स्विमसूटमध्ये राहणे आणि पाण्याचे सेवन कमी करणे या सवयी यूटीआयचा धोका वाढवू शकतात. उन्हाळ्याचा आनंद घ्या, पण आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका. यूटीआयची सुरुवातीची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन डॉ. कैशरीन खान, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, मदरहुड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे यांनी केले.(फोटो सौजन्य – istock)
महिलांमधीस मूत्रमार्ग आकाराने लहान असल्यामुळे जीवाणूंना मूत्राशयापर्यंत पोहोचणे सोपे जाते. त्यामुळे उन्हाळ्यातील काही दुर्लक्षित सवयी संसर्गास कारणीभूत ठरू शकतात.अनेक महिला लांबच्या प्रवासात स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे लघवी बराच वेळ रोखून धरतात. त्यामुळे मूत्रमार्गातील जीवाणू बाहेर न पडता वाढू लागतात आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पोहल्यानंतर बराच वेळ ओल्या स्विमसूटमध्ये राहिल्यास जननेंद्रियांच्या जीवाणूंच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते.
यूटीआयची लक्षणं म्हणजे लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवीची भावना होणे, दुर्गंधीयुक्त किंवा फेसाळ लघवी तसेच पोटाच्या खालच्या भागात वेदना जाणवणे यांचा समावेश होतो. अनेक महिला ही लक्षणे उष्णता किंवा शरीरातील पाण्याची कमतरता समजून याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, वेळीच उपचार न केल्यास संसर्ग मूत्राशयातून किडनीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे ताप, पाठदुखी, मळमळ आणि उलट्या यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे डिहायड्रेशन होऊन शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते आणि जीवाणू बाहेर टाकण्याची प्रक्रिया मंदावते. तसेच घट्ट कपडे, रासायनिक पदार्थांची समावेश असलेली स्वच्छता उत्पादने, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर आणि अस्वच्छता यांमुळेही संसर्गाचा धोका वाढतो.
महिलांनी दररोज २ ते ३ लिटर पाणी पिणे, लघवी दीर्घकाळ रोखून न धरणे, पोहून आल्यानंतर त्वरित कोरडे कपडे बदलणे, सैल आणि सूती अंतर्वस्त्रे वापरणे, तसेच वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घेऊन स्वच्छतागृहाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच पोहल्यानंतर किंवा लैंगिक संबंधांनंतर लघवी केल्यास जीवाणू बाहेर टाकण्यास मदत होते.
Ans: उन्हाळ्यात जास्त घाम येणे, शरीरातील पाण्याची कमतरता, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि बॅक्टेरियांची वाढ यामुळे काही लोकांमध्ये यूटीआयचा धोका वाढू शकतो.
Ans: UTI म्हणजे Urinary Tract Infection म्हणजेच मूत्रमार्गातील संसर्ग. हा संसर्ग मूत्रपिंड, मूत्राशय किंवा मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो.
Ans: लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी लागणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे, लघवीला दुर्गंधी येणे किंवा अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात.






