दर आठवड्याला २ ते ३ महिलांमध्ये आढळतात रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे; वेळीच निदान आणि जनजागृतीची अत्यावश्यकता
पुणे: रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या घटकांच्या (क्लॉटिंग फॅक्टर) कमतरतेच्या महिला रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. अनेक महिलांना या आजाराबाबत माहिती नसते, कारण त्याची लक्षणे सामान्य मासिक पाळीशी संबंधित समस्यांप्रमाणे भासतात. या विषयावर फारशी चर्चा देखील केली जात नाही मात्र वेळीच निदान न झाल्यास गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी असामान्य रक्तस्त्राव आणि आरोग्याच्या लक्षणांकडे वेळीच अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – AI)
महिलांमध्ये आढळणाऱ्या आणि अनेकदा दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या विकारांपैकी एक म्हणजे ‘व्हॉन विलिब्रँड डिसीज’. हा एक आनुवंशिक आजार आहे. या विकारामुळे रक्त योग्यरित्या गोठत नाही. याशिवाय काही महिला हिमोफिलियाच्या वाहक (carrier) असू शकतात किंवा यकृताचे आजार, संसर्ग, हार्मोनल असंतुलन किंवा व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळेही रक्त गोठण्याच्या समस्या उद्भवू शकतात.
क्लॉटिंग फॅक्टरची कमतरता म्हणजे शरीरात रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची कमतरता. महिलांमध्ये ही समस्या आनुवंशिक असू शकते, जसे की हिमोफिलियाचे वाहक असणे किंवा इतर रक्तस्त्रावाशी संबंधित आनुवंशिक विकार. यकृताच्या समस्या, संसर्ग, हार्मोनल बदल किंवा व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळेही हा विकार उद्भवू शकतो.
या विकाराची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात किंवा सामान्य लक्षणं समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. महिलांना असामान्य किंवा दीर्घकाळ मासिक पाळी येणे, वारंवार शरीरावर निळे डाग पडणे, हिरड्यांतून रक्त येणे किंवा किरकोळ दुखापत अथवा उपचारानंतरही जास्त रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये प्रसूतीनंतर किंवा स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रियेनंतरही दीर्घकाळ रक्तस्त्राव होऊ शकतो. ही लक्षणे सामान्य मासिक पाळी किंवा हार्मोनल समस्यांप्रमाणे समजून दुर्लक्षित केली जातात, असे मत लुल्लानगर, पुणे येथील मदरहुड हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.
डॉ. पद्मा पुढे सांगतात की, दर आठवड्याला सुमारे २ ते ३ महिला अशा लक्षणांसह उपचारासाठी येत आहेत. या रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे अचुक निदान, वाढती जनजागृती तसेस आहाराच्या चुकीच्या सवयी, तणाव आणि इतर आरोग्यविषयक समस्या यांसारखे जीवनशैलीशी संबंधित घटक कारणीभूत ठरतात. निदानास होणारा विलंब हे देखील एक मोठे आव्हान आहे, कारण अनेक महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात.
त्या पुढे म्हणाल्या, या विकारावर उपचार त्याच्या तीव्रतेनुसार केले जातात. यात क्लॉटिंग फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी, रक्तस्त्राव नियंत्रित करणारी औषधे आणि नियमित तपासणी यांचा समावेश होतो. योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास बहुतांश महिला निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगू शकतात. त्यामुळे महिलांनी असामान्य किंवा अति रक्तस्त्रावाकडे गांभीर्याने पाहून वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. वेळीच निदान झाल्यास गुंतागुंत टाळता येते आणि जीवनमान सुधारते.
Ans: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास किंवा रक्तस्त्राव थांबण्यास वेळ लागल्यास त्याला रक्तस्त्रावासंबंधी विकार म्हटले जाते.
Ans: मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे, जखम झाल्यानंतर रक्त जास्त वेळ वाहणे, वारंवार निळे डाग पडणे, नाकातून रक्त येणे किंवा हिरड्यांतून रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: नाही. खूप जास्त रक्तस्राव, दीर्घकाळ पाळी राहणे किंवा वारंवार जास्त रक्त जाणे हे काही वेळा रक्तस्त्रावाच्या विकारांचे संकेत असू शकतात.






