काही औषधांमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. विशेषतः नैराश्यावरील औषधे, स्टेरॉइड्स किंवा काही हार्मोनल औषधांमुळे शरीरातील चयापचय प्रक्रियेत बदल होऊ शकतो. औषधे सुरू केल्यानंतर वजन वाढत असल्याचे जाणवल्यास स्वतःहून औषधे बंद करू नयेत. त्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
थायरॉइडची समस्या, हार्मोनल बदल किंवा महिलांमध्ये पीसीओएससारख्या स्थितींमुळेही वजन झपाट्याने वाढू शकते. हार्मोन्स शरीरातील अनेक प्रक्रिया नियंत्रित करतात. त्यामुळे त्यामध्ये बिघाड झाल्यास वजनासह इतर आरोग्य समस्याही निर्माण होऊ शकतात.
अपुरी झोप, सततचा ताण, मानसिक तणाव आणि अनियमित जीवनशैली यामुळे भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. परिणामी जास्त खाणे, चयापचय मंदावणे आणि वजन वाढणे अशी समस्या निर्माण होऊ शकते. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे हा धोका कमी होऊ शकतो.
काही वेळा अचानक वाढलेले वजन हे चरबीमुळे नसून शरीरात द्रव साचल्यामुळेही असू शकते. मूत्रपिंड, हृदय किंवा इतर वैद्यकीय समस्यांमुळे अशी स्थिती उद्भवू शकते. वजनासोबत पायांना सूज, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अचानक वजन वाढल्यास ते केवळ लठ्ठपणाचे लक्षण समजून दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, पुरेसे पाणी पिणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. वजन सातत्याने वाढत असल्यास किंवा इतर त्रासही जाणवत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घेणे हाच सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






