(फोटो सौजन्य: istock)
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांनी एक अतिशय मनोरंजक अभ्यास केला आहे, ज्यातून स्पष्ट झालं आहे की, शारीरिक हालचाल मेदूच्या आरोग्यावर चांगला परिणाम करत असते. नेचर न्यूरोसायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, जेव्हा आपण उभे राहतो किंवा एक पाऊल टाकतो, तेव्हा आपल्या पोटाचे स्नायू आकुंचन पावतात. हे आकुंचन शरीरात नैसर्गिक पंपासारखे कार्य करते. हा पंप रक्त मणक्याकडे ढकलतो ज्यामुळे एक सौम्य दाब निर्माण होतो. परिणामी यामुळे मेंदूमध्ये एक सूक्ष्म हालचाल निर्माण होते, ज्यामुळे मेंदूच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते.
मेंदूचे संरक्षक कवच
मेंदूच्या चारही बाजूला सेरेब्रोस्पाइनल नावाचे एक द्रव असते. हे द्रव मेंदूला आवश्यक पोषण मिळवून देते, बाह्य धक्क्यांपासून संरक्षण करते आणि मेंदूत साचलेली घाण आणि विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्यास मदत करते.
जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असतो, तेव्हा निर्माण होणारा दाब या द्रवाचा प्रवाह गतिमान करतो. शास्त्रज्ञांनी या संपूर्ण प्रक्रियेचे वर्णन ग्लायम्फॅटिक प्रणालीचा भाग म्हणून केले आहे, जी मूळत: आपल्या मेंदूची स्वच्छता प्रणाली आहे.
साफसफाई म्हणजे एका घाणेरड्या स्पंजसारखी असते
शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेची तुलना घाणेरडा स्पंज पिळण्याशी केली आहे. ज्याप्रकारे हाताने घाणेरडा स्पंज पिळल्याने त्यात साचलेली सर्व घाण निघून जाते त्याचप्रमाणे जेव्हा शारीरिक हालचालींमुळे मेंदूला चालना मिळते, तेव्हा त्यात साचलेली सर्व घाण ही बाहेर पडते.
उंदरांवर केलेले संशोधन
शास्त्रज्ञांनी उंदरावर केलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, त्यांचे स्नायू सक्रिय झाल्यावर मेंदू देखील अधिक सक्रिय झाला. यामुळे द्रवाचा प्रवाह वेगवान झाला. अनेकांना असे वाटते की कोडी सोडवून आपण मेंदूला तल्लख ठेवू शकते परंतु नवे संशोधन हे स्पष्ट करते की, शारीरिक हालचाल देखील आपल्या निरोगी मेंंदूसाठी फार महत्त्वाची आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






