अल्झायमर म्हणजे काय? सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेल्या महत्वपूर्ण टिप्स
अल्झायमर या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी जांभळ्या (Purple) रंगाच्या रिबनचा वापर केला जातो आणि दरवर्षी जून महिन्यात या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित हळूहळू वाढणारा (प्रोग्रेसिव्ह न्यूरोडिजेनेरेटिव्ह) आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या विचार करण्याच्या, आठवण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमता कमी होत जातात. याविषयी डॉ. वर्षा बिर्ला, एमडी, डीएनबी (बायोकेमिस्ट्री), रिजनल क्वालिटी हेड, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि.यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
डिमेन्शियामध्ये सर्वात सामान्य प्रकार म्हणजे अल्झायमर रोग. Alzheimer’s Disease International (2020) च्या अहवालानुसार, 2020 मध्ये जगभरात 5.5 कोटींहून अधिक लोक डिमेन्शियाने ग्रस्त होते आणि 2050 पर्यंत हा आकडा 15.2 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
अनेकांना वाटतं की वय वाढलं की विसरभोळेपणा येणं हे स्वाभाविक आहे. पण अल्झायमर हा केवळ वाढत्या वयाचा भाग नाही. हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार असून, व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारा आजार आहे. अल्झायमर हा हळूहळू वाढणारा आजार आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार हा आजार विकसित होण्यासाठी साधारणपणे 7 ते 14 वर्षे लागू शकतात. या काळात मेंदूमध्ये होणारे बदल अनेक वर्षे शांतपणे सुरू असतात आणि स्पष्ट लक्षणे दिसण्यापूर्वीच त्यांची सुरुवात झालेली असते.
सुरुवातीच्या टप्प्यातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे नेहमीचा विसरभोळेपणा आणि अल्झायमरची सुरुवात यामधला फरक ओळखणं. Alzheimer’s Association ने अल्झायमर आणि वयानुसार होणारा सामान्य विसरभोळेपणा यामधील फरक समजण्यासाठी 10 महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या नवीन व्यक्तीचं नाव लगेच आठवलं नाही, पण नंतर आठवलं, तर ते वयानुसार सामान्य मानलं जाऊ शकतं. मात्र खालील लक्षणे दिसू लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
National Institute on Aging च्या मते, जर विसरभोळेपणा किंवा विचार करण्याच्या क्षमतेतील बदलांमुळे दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.अशी लक्षणे नेहमीच अल्झायमरमुळे असतात असे नाही. काही वेळा त्यामागे नैराश्य (Depression), औषधांचे दुष्परिणाम किंवा स्ट्रोकसारखे गंभीर आजार असू शकतात, ज्यासाठी तातडीने उपचारांची गरज असते.लवकर निदान झाल्यास उपचारांचे पर्याय वेळेत सुरू करता येतात, ज्यामुळे लक्षणे नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि व्यक्ती अधिक काळ स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकते. आज उपलब्ध असलेल्या अत्यंत अचूक रक्त तपासण्यांमुळे अधिक निश्चित निदान करून योग्य उपचार लवकर सुरू करणे शक्य झाले आहे.
आजाराचे निदान करण्यासाठी आता केवळ आक्रमक (Invasive) चाचण्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.तपासणीमध्ये रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी, स्मरणशक्ती आणि विचारक्षमतेच्या चाचण्या, रक्त तपासण्या तसेच मेंदूचे सीटी स्कॅन (CT Scan) किंवा एमआरआय (MRI) यांचा समावेश असू शकतो. मे 2025 मध्ये अमेरिकेच्या Food and Drug Administration (FDA) ने अल्झायमरच्या निदानासाठी मदत करणाऱ्या Lumipulse या पहिल्या रक्त तपासणीला मान्यता दिली.
या चाचणीत रक्तातील pTau217 आणि beta-amyloid 1-42 या दोन प्रोटीन्सचे प्रमाण आणि त्यांचे गुणोत्तर तपासले जाते, ज्यामुळे मेंदूमध्ये Amyloid Plaques आहेत का याचा अंदाज घेता येतो. ज्या रुग्णांमध्ये या तपासणीतील मूल्ये ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असतात, त्यांना 90% पेक्षा जास्त शक्यतेने अल्झायमर असू शकतो. मात्र या चाचणीचा अहवाल नेहमी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, कौटुंबिक इतिहास आणि संज्ञानात्मक (Cognitive) तपासण्यांसोबतच समजून घेतला पाहिजे.
याशिवाय, National Institutes of Health (NIH) च्या मदतीने संशोधकांनी p-tau217 या रक्त तपासणीवर आधारित एक Predictive Clock Model विकसित केला आहे. या मॉडेलच्या मदतीने अल्झायमरची लक्षणे कधी सुरू होण्याची शक्यता आहे, याचा अंदाज घेता येतो. याविषयीचा अभ्यास फेब्रुवारी 2026 मध्ये Nature Medicine या जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता (NIH, 2026).
एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळच्या व्यक्तीचं नाव विसरायला लागलं, तेव्हाच अल्झायमरची सुरुवात होते असं नाही. हा आजार त्यापूर्वी अनेक वर्षे शांतपणे मेंदूमध्ये विकसित होत असतो. या आजाराचा सर्वात मोठा जोखीम घटक म्हणजे वाढतं वय. अल्झायमरच्या 90% पेक्षा जास्त रुग्णांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असते. याशिवाय कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैली यांचाही धोका वाढवण्यात महत्त्वाचा वाटा असतो. स्वतःमध्ये किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः या जनजागृती महिन्यात याबाबत जागरूक व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि लवकर उपचार हीच अल्झायमरविरुद्धची सर्वात मोठी आशा आहे.






