26/11 Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम (फोटो सौजन्य - pinterest)
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईत 17 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याची फक्त भारतातच नाहीतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या हल्ल्याला 17 वर्षे झाली असली तरीही जखम मुंबईकरांच्या मनात अजूनही कायम आहे. हल्ला होऊन इतका काळ उलटूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची सुरक्षा व्यवस्था आजही रामभरोसेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीएसएमटी स्थानकाला 26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पहिले लक्ष्य केले होते. या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. काही प्रमाणात त्या लागू करण्यात आल्या; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्या अपुऱ्या आहेत. स्थानकातून रोज लोकलच्या १८१० फेऱ्या होतात. लांब पल्याच्या १०० मेल-एक्सप्रेसची ये-जा होते. लोकल आणि मेल एक्सप्रेसमधून सुमारे १२ लाख प्रवासी ये-जा करतात. या स्थानकात तीन प्रवेशद्वार आहेत; मात्र, यातील दोन प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर मशिन नाहीत. फक्त बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी असलेल्या प्रवेशद्वारावर या मशिन प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्याआधी लावल्या आहेत.
हेदेखील वाचा : BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले
लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर पुरेसे सुरक्षारक्षक नाहीत. स्थानकांवर डोअर मेटल डिटेक्टरची नियमित देखभाल केली जात नसल्याने ते बंद आहेत. मुंबईवरील या हल्ल्यात कामा रुग्णालय, सीएसएमटी रेल्वेस्थानक, ताज हॉटेलसह २ लक्झरी हॉटेल्सना अतिरेक्यांनी लक्ष्य केले होते. हल्ल्यात १६६ लोक मारले गेले, तर ३०० वर जखमी झाले होते.
अनेक ठिकाणी बॅग स्कॅनर बंद
सीएसएमटीवर सध्या एकच बॅग स्कॅनर शिल्लक आहे. इतर स्कॅनर बंद पडल्याने काढून टाकण्यात आले. डोअर मेटल डिटेक्टर गायब झाले. हॅण्ड मेटल डिटेक्टर उपलब्ध नाहीत. या मशीन बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी, पनवेल येथेही स्कॅनर लागणार आहे. मात्र, या सुरक्षा यंत्रणांची प्रतिक्षा कायम आहे.






