Top Marathi News Today Live
अहमदाबाद: आयपीएल २०२६ च्या (IPL 2026) अंतिम सामन्यानंतर (Final Match) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. सामना संपल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या बसला अचानक भीषण आग लागली. आग लागली त्या वेळी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बसमध्येच उपस्थित असल्याने काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग बसमधील शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसमधून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाला निघू लागल्याने एकच खळबळ उडाली.
01 Jun 2026 05:59 PM (IST)
रत्नागिरीतील शिवाजी नगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीने मोठे रूप धारण केले. आगीने डायलिसिस विभागात धुराचे प्रचंड लोण निर्माण झाल्याने डायलिसिस विभागातील अनेक वृद्ध रुग्ण गुदमरले. सुरुवातील आग छोटी असताना आगीवर नियंत्रण न मिळवल्याने आगीचा भडका उडाला. आग लागल्याचे कळताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. येथील रुग्णाला कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर काढत अन्य रुग्णालयात हलवले. आग आटोक्यात आणण्यासाठी रनप च्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले.
01 Jun 2026 05:52 PM (IST)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटीचा आज ७८ वा वर्धापन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुडाळ आगारात एसटी बस सजवून आणि केक कापण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
01 Jun 2026 05:41 PM (IST)
मॉर्निंग वॉकला जाताना एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करून लुटल्याप्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी 9 आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींपैकी सहा अल्पवयीन आहेत. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन तरुण या गॅंगच्या मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन तरुणाने एकाची हत्या देखील केली आहे. बाल सुधार गृहातून सुटून आल्यानंतर अल्पवयीन तरुणाने त्याच्या अल्पवयीन भावासोबत चोरट्यांची गॅंग तयार केली.
01 Jun 2026 05:37 PM (IST)
अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि भव्य शक्तीप्रदर्शनासह दाखल केला आहे. याप्रसंगी महायुतीचे दिग्गज नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे यांच्यासह महायुतीचे अनेक आजी-माजी आमदार, नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
01 Jun 2026 05:23 PM (IST)
मुंबई, दि. २७ मे : राज्यातील जवळपास तीन लाख लघु कंत्राटदार आणि विकासकांना पूर्ण केलेल्या शासकीय प्रकल्पांची देयके न देता भाजपप्रणीत महाराष्ट्र सरकार त्यांना आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर आणत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
राज्य सरकारचे “व्यवसायपूरक” आणि “एमएसएमई समर्थक” असल्याचे दावे प्रत्यक्षात पूर्णपणे फोल ठरत असल्याचे सांगत तपासे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हजारो लघु कंत्राटदारांना पूर्ण झालेल्या कामांची देयके मिळण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
01 Jun 2026 05:16 PM (IST)
देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो,पण मनापासून चिंतन केल्यास देव भेटतो असे मत जयेश महाराज भाग्यवंत यांनी मांडले.देव हा सर्वांचा बाप आहे तर देव हा देखील देवाची पूजा करीत असतो,भगवंत प्रसन्न होऊन तुम्हाला नक्की प्रसाद देईल असा विश्वास भाग्यवंत महाराज यांनी व्यक्त केला.दरम्यान वीणा ही वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान आहे आणि त्यामुळे वीणा नाचवायचा असेल तर दोन तीन महिन्याचे लेकरू याला सांभाळून घेतो असे सांभाळून वीणा नाचवावे असे सूचित करीत वीणा नाचवू नये असे आवाहन केले.
नेरळ येथे श्री संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने बालसंस्कार आध्यात्मिक शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी काल्याचे कीर्तन डोंबिवली येथील जयेश महाराज भाग्यवंत यांनी सादर केले. देवाचे दर्शन म्हणजे पाहणे आणि पंढरीत गेल्यावर फक्त एकच काम करायला हवे ते म्हणजे देवाचे दर्शन घेत असताना देवाचे एक एक अलंकार पाहत दर्शन घेत घेत पुढे जावे आणि देवाचा अनुभव घ्या हाच आपला एकमेव उद्देश असायला हवा.आपण देवाचे दर्शन घेण्यासाठी जात असतो आणि त्यामुळे मंदिराच्या इतर बाबींकडे लक्ष न देता देवाचे दर्शन हाच आपला मुख्य कार्यक्रम असला पाहिजे. मंदिरातून बाहेर आल्यावर काय पाहिले हे एकमेकांना विचारावे जेणेकरून सर्वांनी देवाला पाहायला हवे असे प्रतिपादन यावेळी कीर्तनातून केले.
01 Jun 2026 05:06 PM (IST)
कोणार्क एक्सप्रेस मध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे निकी कुमार शहा आणि कुलदीप मंडल असे या तरुणांची नावे आहेत बिया बिहारहून दोघे गांजा घेऊन कल्याणला आले होते कल्याण रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ट्रेन आली असता आरपीएफ जवानांना या दोघांवर संशय आला जीआरपीच्या मदतीने आरपीएफ जवानाने जेव्हा यांच्या जवळील गोणीची तपासणी केली त्यामध्ये वीस किलो गांजा आढळून आला हा गांजा कुणासाठी आणला गेला आहे याच्या तपास आता कल्याण जीआरपी पोलिसांनी सुरू केला आहे
01 Jun 2026 04:58 PM (IST)
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राणी लंके यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत असतानाही त्यांनी अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नेमका कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान काँग्रेसचे करण ससाणे यांचा अर्ज कायम असून आता निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली. महाविकास आघाडीकडून उमेदवारीची सर्वाधिक चर्चा असलेल्या राणी लंके यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची रणनीती नेमकी काय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
01 Jun 2026 04:49 PM (IST)
देशभरात पेट्रोल डिझेल सीएनजी या इंधन दरवाढीचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. आता याचा फटका नावाजलेल्या फ्लिपकार्ट कंपनीतील कर्मचाऱ्यांना देखील बसत आहे. कर्मचाऱ्यांना मालाची डिलिव्हरी करता देण्यात येणाऱ्या फरकाची रक्कम वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर ऐरोली आणि कोपरखैरणे येथील डिलिव्हरी ऑर्डर्स या थेट घनसोलीत येत असल्याने एक प्रकारे कर्मचाऱ्यांना बेरोजगार करण्याचा डाव कंपनीच्या एजन्सीने सुरू केला आहे. मात्र, व्यवस्थापनाने कोणताही निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.
01 Jun 2026 04:37 PM (IST)
स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुकीसाठी आज महायुतीतर्फे अनिकेत सुनिल तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता खर्या अर्थाने उद्यापासून निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदूर्ग-रायगड कोकण विधानपरिषद मतदारसंधाच्या निवड़णुकीसाठी महायुतीचेअधिक्त उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आपला उमदेवारी अर्ज आज निवडणुक निर्य अधिकारी मनूज जिंदल यांच्याकडे दाखल केला. यावेळी मंत्री उदयसामंत, मंत्री नितेश राणे, राष्टवादी प्रदेशाध्यक्ष सुनीलतटकरे, मंत्री दिपक केसरकर उपस्थित होते.
01 Jun 2026 04:25 PM (IST)
कुडाळ शहराचा आज वेगाने विकास आणि विस्तार होत आहे, मात्र हे होत असताना अनेक नागरी आणि पर्यावरणीय सुविधा मागे पडत चालल्या आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुडाळ युवासेनेतर्फे एका विशेष आणि कौतुकास्पद पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शहरात तब्बल ५००० झाडे लावण्याचा मानस असून, पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हा महत्त्वाचा पाऊल उचलण्यात येत असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शिवसेनेच्या माध्यमातून ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ ही एक अनोखी आणि आधुनिक योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी एक विशेष QR कोड जनरेट केला जाणार असून तो कुडाळमधील जनतेपर्यंत पोहोचवला जाईल.
01 Jun 2026 03:56 PM (IST)
देशात जून महिन्याची सुरुवात अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह झाली आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल हा LPG सिलिंडर्सशी संबंधित नियमांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचा आहे. सरकारने आता दुहेरी गॅस जोडण्या पूर्णपणे संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवसापासून, ज्या ग्राहकांकडे PNG जोडण्या आहेत, त्यांच्यासाठी ३० दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे; जर या कालावधीत LPG सिलेंडर परत केला गेला नाही, तर संबंधित गॅस जोडणी रद्द केली जाण्याची शक्यता आहे.
01 Jun 2026 03:48 PM (IST)
सिडको पोलिस ठाण्याच्या अगदी शेजारी असलेल्या रामलीला मैदान परिसरात रविवारी पहाटे १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान या रक्तरंजित घटनेत झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर खून होऊनही पोलिसांना त्याची माहिती सकाळपर्यंत मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रवीण सुरेश मांडोळे (१८, रा. संभाजी कॉलनी, एन-६) असे मृताचे नाव आहे. गुन्हे शाखा आणि सिडको पोलिसांच्या पथकाने मुख्य आरोपी प्रसंजीत हिवाळे आणि अरूण भूल या दोघांना नेवासा येथून अटक केली आहे.
01 Jun 2026 03:38 PM (IST)
उत्तर प्रदेश सरकार सुमारे ४,२०० कर्मचाऱ्यांचे क्लोज्ड यूजर ग्रुप (CUG) मोबाईल कनेक्शन व्होडाफोन आयडिया (Vi) कडून सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडे हस्तांतरित करत आहे. CUG म्हणजे असा गट किंवा नेटवर्क, जिथे सदस्य कोणत्याही कॉल शुल्काशिवाय एकमेकांशी पाहिजे तितके बोलू शकतात. उदाहरणार्थ, ५० कर्मचारी असलेल्या कंपनीचा विचार करा. ही कंपनी त्या सर्वांना एका विशेष CUG योजनेअंतर्गत मोबाईल सिम कार्ड पुरवते.
01 Jun 2026 03:27 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पुण्यातून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरुन पुण्यात नाराजीनाट्याला सुरूवात झाली आहे. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीनंतर पक्षात नव्या बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. यात पुण्यातून पहिला राजीनामा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसबा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
01 Jun 2026 03:19 PM (IST)
पश्चिम बंगालमधील सुवेंदू सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा सोमवार १ जून रोजी पार पडला. राज्यपाल आर. एन. रवी यांच्या उपस्थितीत राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण ३५ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. शपथ घेतलेल्या प्रमुख नावांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि मोयना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक डिंडा यांच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माजी वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आता राजकारणाच्या मैदानात नवी इनिंग खेळताना दिसणार आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात डिंडा यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे क्रिकेटव विश्वातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे.
01 Jun 2026 03:09 PM (IST)
Khoda Surya Murder Case News Marathi : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील खोडा कॉलनीत सूर्य चौहानच्या हत्येनंतर, आरोपी असद पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. असदच्या चकमकीवरून आता राजकारण पेटले आहे. भाजप नेते संगीत सोम यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांची भेट घेतली आणि कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असे सांगितले.
01 Jun 2026 02:59 PM (IST)
आजपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित 7 मोठे बदल लागू होणार आहेत.... या बदलांचा थेट परिणाम तुमच्या मासिक बजेटवर आणि आर्थिक नियोजनावर होणार आहे...बँकिंग, UPIसह 7 मोठे बदल होत आहेत...व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरात आजपासून बदल झाले आहेत...व्यावसायिक गॅस 42 रुपयांनी महाग झालाय...त्यामुळे हॉटेलिंग महागणार आहे...तसेच तुम्ही वारंवार एटीएममधून पैस काढत असाल तर जरा जपून कारण वारंवार पैसे काढणं महाग होणार आहे...
01 Jun 2026 02:50 PM (IST)
डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराला जागा मंजूर करण्यात आलीये.. मंदिरासाठी 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय..सरकारमधील सर्वांनी एकमताने जागा देण्याचा निर्णय घेतल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय.. या निर्णयामुळे पिंपळेश्वर मंदिरभूमीची अनेक वर्षांची लढाई अखेर यशस्वी ठरल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केलीये..तसंच मंदिराला जागा मिळावी ही हा त्यांचा संकल्प पूर्ण झाल्याने त्यांनी सहकुटुंब श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात पूजा केलीये.
01 Jun 2026 02:39 PM (IST)
मावळमध्ये तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झालाय. यातील पहिली घटना बेबडओहळ परिसरातील पवना नदीत घडलीये. तर दुसरी घटना संत तुकाराम महाराजांच्या देहू येथील गाथा मंदिराजवळील इंद्रायणी नदीच्या डोहात घडली. तिसरी घटना कुंडमळा येथे इंद्रायणी नदीपात्रात घडली. या तिन्ही घटनांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
01 Jun 2026 02:30 PM (IST)
मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली बंद करण्यात आलीयं. मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा येथे अपूर्ण कामादरम्यान सुरू केलेल्या टोल वसुलीविरोधात जनआक्रोश समितीने जोरदार आंदोलन करत टोलनाका बंद पाडला. आंदोलनात स्थानिक नागरिक, वाहनचालक, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. सेवा रस्ते, स्वच्छतागृह, पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. तरीही टोलवसुली सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.आधी रस्त्यावर लाइट लावा, सेवा रस्ते सुस्थितीत करा, मगच टोल घ्या, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
01 Jun 2026 02:21 PM (IST)
त्र्यंबकेश्वरमध्ये एकाच दिवसात २० लाख रुपयांची तिकीट विक्री झालीय. व्हीआयपी दर्शनाचा कोट्यवधींचा काळाबाजार रोखण्यासाठी अती तातडीची सशुल्क दर्शन सुविधा सुरु केलेली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसांत 836 भाविकांनी अतीतातडीची दर्शन तिकिटं घेतली. 4 दिवसात एकूण 1400 तिकिटांमधून 35 लाखांचं संस्थानाला उत्पन्न मिळालंय. संस्थांनच्या 2500 रुपयांच्या अती तातडीच्या दर्शन योजनेला उदंड प्रतिसाद मिळालाय.
01 Jun 2026 02:11 PM (IST)
जळगावमध्ये भाजपचा मोठा विजय होणार ! गिरीश महाजनांचा दावा नाशिक दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, "मी नाशिकला जात आहे, तिथे कुठलीही नाराजी नाही." तसेच शिवसेनेच्या काही आमदारांच्या अनुपस्थितीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, "नाराजी नाही, सर्वजण आपापल्या उमेदवाराच्या अर्ज दाखल प्रक्रियेत व्यस्त आहेत." गुलाबराव पाटील यांच्या चिरंजीवांना तिकीट मिळावं यासाठी आग्रह होता, या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "अशी कोणतीही नाराजी नाही, सर्व काही सुरळीत आहे," असं महाजन म्हणाले.
01 Jun 2026 02:00 PM (IST)
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणात २३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला असून, राज्यभरातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. डॉ. देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व उत्पादन शुल्क अधीक्षकांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी अवैध मद्यविक्री, निर्मिती किंवा तस्करीची माहिती मिळेल, त्या ठिकाणी तात्काळ छापेमारी करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले.
01 Jun 2026 01:55 PM (IST)
“विकासकामांसाठी भाजपमध्ये जात असल्याचे कारण आता जनतेला पटणारे राहिलेले नाही. विकासकामे करायची आहेत म्हणून पक्षांतर केले जाते, हा केवळ दिखावा आहे. भाजपने किमान आपल्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांप्रती तरी निष्ठा दाखवली पाहिजे.” अशा शब्दांत प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यात विधान परिषद निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी सुरू आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची घोषणा होत असताना शिवसेना संजय राऊत यांनी भाजप, महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
01 Jun 2026 01:45 PM (IST)
भारतीय जनता पक्षाची (BJP) संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळ या दोन्हीमध्ये आता मोठे अनपेक्षित बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष हेही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यातील बैठक अंदाजे चार तास चालली असे वृत्त आहे. सूत्रांनुसार, पक्षाची संघटना मजबूत करणे हा मुख्य अजेंडा होता. तथापि, पंतप्रधान मोदी येत्या रविवारपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
01 Jun 2026 01:35 PM (IST)
सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करणारी ही पिढी नावीन्याचा शोध घेत असते, स्वत: ला सिद्ध करणे यासाठी धडपड करणारी आहे. वेगवेगळे छंद, आवडीनिवडी , औत्युक्याचे विषय यामुळे नेटवर्किंग वाढत जात आहे. याचदरम्यान, जगभरातील अनेक देशांनी सोशल मीडियाच्या वाढत्या दुष्परिणामांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियासारख्या देशांनी १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर आधीच बंदी घातली आहे. आता, आणखी एका देशाने त्यांचेच अनुकरण केले आहे. मलेशियाने १ जून २०२६ पासून १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया खाती तयार करण्यावर आणि वापरण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
01 Jun 2026 01:25 PM (IST)
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफी आपल्याकडेच ठेवली आहे आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. २०२५ मध्ये पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबीला आपले दुसरे विजेतेपद पटकावण्यासाठी जास्त वाट पाहावी लागली नाही, त्यांनी एका वर्षाच्या आतच दुसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवले. यासह, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने एक असा पराक्रम केला, जो आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही कर्णधाराने केला नव्हता. १८ वर्षात पहिल्यांंदाच रजत पाटीदारने मागच्या वर्षी बंगळुरूला हा आनंद मिळवून दिला होता आणि सलग दुसऱ्या वर्षीही या कर्णधाराने आपला मान राखला.
01 Jun 2026 01:15 PM (IST)
जर तुम्ही देखील सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. १ जून २०२६ म्हणजेच आज, सोमवार रोजी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये बदल दिसून आले आहेत. जागतिक बाजारातील कल, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती आणि देशांतर्गत मागणी या दरांवर प्रभाव टाकत आहेत. चला, आज तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे अद्ययावत दर जाणून घेऊया.
01 Jun 2026 01:05 PM (IST)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता १२ वीची री इव्हॅल्युएशन आणि गुण पडताळणी प्रक्रिया आज म्हणजेच १ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन करायचे आहे. त्यांनी बोर्डाच्या अधिकृत cbse.gov.in किंवा cbseit.inया वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या अर्ज शुल्काची माहिती बोर्डाने आधीच जाहिर केली आहे, त्यानुसार प्रति विषय १०० रुपये अर्ज शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागेल. तर री-इव्हॅल्युएशनसाठी अर्ज शुल्क प्रति प्रश्न २५ रुपये आहे. तसेच बोर्डाने असेही म्हटले आहे की, जर री-इव्हॅल्युएशननंतर विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ झाल्यास त्याचे पूर्ण शुल्क परत रिफंड केले जाईल.
01 Jun 2026 01:02 PM (IST)
आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात जुन्या पिढीची संस्कृती, मूल्ये आणि संस्कारांचा विसर पडत चालल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. क्षुल्लक कारणांवरून वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच, दुसरीकडे पितृप्रेमाचा आणि कृतज्ञतेचा एक अनोखा अन् आदर्श वस्तुपाठ भोर तालुक्यातील भाबवडी गावात पाहायला मिळाला आहे. येथील सुपुत्र रमेश बुदगुडे यांनी आपले दिवंगत वडील ज्ञानोबा बुदगुडे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी घरासमोरच एक अत्यंत देखणे आणि भावूक करणारे स्मारक उभारले आहे. वडिलांचा हाच खडतर प्रवास, त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या आठवणी पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहाव्यात, यासाठी रमेश बुदगुडे यांनी एक आगळा- वेगळा निर्णय घेतला. त्यांनी केवळ वडिलांचाच पुतळा न उभारता, वडिलांच्या पूर्णाकृती मूर्तीसोबतच त्यांच्या शेतीची शान असलेली 'सर्जा - राजा' ही बैलजोडी आणि कुटुंबाचे रक्षण करणारा घरातील लाडका इमानदार 'रॉकी' नावाचा कुत्रा यांचेही हुबेहूब आणि सुंदर स्मारक तयार केले आहे. हे स्मारक पाहताना ज्ञानोबा शेतात उभे असल्याचाच भास होतो. रमेश बुदगुडे यांचे हे अनोखे पितृप्रेम पाहून अनेक ग्रामस्थांचे डोळे पाणावले असून, संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
01 Jun 2026 12:48 PM (IST)
पुणे शहरातील विषारी दारूकांडात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अवैध दारू व्यवसायाविरोधात संताप व्यक्त होत असताना शिवसेनेने हडपसर परिसरात धडक कारवाई केली आहे. कृष्णानगर, तरवडे वस्ती पोलीस चौकीच्या परिसरात तसेच साठे वस्ती भागात सुरू असलेल्या अवैध दारू हातभट्ट्यांवर शिवसैनिकांनी धडक देत शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा नष्ट केला आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी अवैध दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केले. यावेळी बोलताना प्रमोद भानगिरे यांनी अवैध दारू व्यवसायाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अवैध दारूभट्ट्या सर्वसामान्य नागरिकांना दिसतात, मग त्या पोलिसांना का दिसत नाहीत?” असा सवाल त्यांनी केला. तसेच शहरातील अनेक भागांत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
01 Jun 2026 12:36 PM (IST)
आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथे एका २४ वर्षीय विवाहित महिलेने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मयत मुलीच्या आईने तिच्या पतीविरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेरणा शुभम तांबडे या विवाहितेचा विवाह ३० एप्रिल २०२५ रोजी शुभम बाबुराव तांबडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याच कारणावरून पत्नीला वारंवार शिवीगाळ, दमदाटी आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. मयत मुलीची आई सुनिता शंकर निघोट यांनी मंचर पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक 30 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ मे रोजी मंचर येथे झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमातही संबंधित पतीने पत्नी आणि तिच्या बहिणींना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रेरणा या मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. दरम्यान, शनिवार ३० मे रोजी सकाळी नातेवाईकांचा फोन आल्यानंतर कुटुंबीय तांबडेमळा येथे पोहोचले असता प्रेरणा यांनी घरातील बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
01 Jun 2026 12:24 PM (IST)
विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का देत पंचायत समिती सदस्य विष्णू गाडी, तालुकाप्रमुख जयेश नर, पुरळ विभाग प्रमुख संदीप डोळकर, मणचे गावचे सरपंच दीपक तोरस्कर, गिर्ये ग्रामपंचायत सदस्य विनोद गावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपा नेते मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी भाजपाचे मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, महिला व बालकल्याण सभापती नारकर, पंचायत समिती सदस्य चव्हाण माजी सभापती रवी पाळेकर यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
01 Jun 2026 12:12 PM (IST)
पिंपरी-चिंचवड शहराला 'स्मार्ट सिटी' बनवण्याचा दावा केला जात असतानाच, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सीसीटीव्ही प्रकल्प रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात प्रस्तावित ३३०० कॅमेऱ्यांपैकी केवळ २८०० कॅमेरे बसवण्यात आले असून, त्यातीलही शेकडो कॅमेरे बंद किंवा आय-सी-सी-सी प्रणालीशी जोडलेले नसल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकारावर पिंपरी चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीज फेडरेशनने तीव्र संताप व्यक्त केला असून, निष्काळजी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
01 Jun 2026 11:55 AM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी यादीतून ८० लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे दरमहा १५०० रुपयांचा लाभ आता यापुढे या महिलांना मिळणार नाही. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात २ कोटी ४६ लाख असलेली लाभार्थ्यांची संख्या आता १ कोटी ६६ लाख झाली आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम ३० एप्रिल रोजी संपली, ज्या महिलांचे ई-केवायसी अपूर्ण राहिले होते, त्यांच्या आवाहनानंतरही सरकारने स्पष्ट केले की मुदतवाढ दिली जाणार नाही.
01 Jun 2026 11:47 AM (IST)
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा महायुतीत अखेर शिवसेना (शिंदे गट) लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जागा निश्चित होताच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, दोन्ही आघाड्यांमधील अंतर्गत रस्सीखेच आणि समीकरणांचे नवे अंक समोर येत आहेत. शिवसेना प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा दिलेला ‘शब्द’ पाळण्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत.परंतु, दुसरीकडे शिंदे गटातूनच इतर मातब्बर इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने आणि भाजप व ठाकरे गट गटाच्या अनपेक्षित हालचालींमुळे ही निवडणूक चुरशीची आणि गुंतागुंतीची बनली आहे.
01 Jun 2026 11:30 AM (IST)
जेईई ॲडव्हांस्ड २०२६ चा निकाल जाहीर झाला असून मुलींमध्ये महाराष्ट्राच्या आरोही देशपांडेने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. पुण्याची रहिवासी असणाऱ्या आरोहीने ऑल इंडिया ७७ वी रँक कशी मिळवली? कोटात राहून तिने कोणत्या रणनीतीने अभ्यास केला.जाणून घ्या तिची यशोगाथा.
01 Jun 2026 11:25 AM (IST)
गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात इंस्टाग्रामवरून झालेली ओळख प्रेमसंबंधात बदलली आणि त्याचा शेवट हत्येत झाला. विवाहित असल्याने लग्नास नकार दिल्याच्या रागातून सूरज हलदार याने सतीशकुमार निसाद याच्यावर चाकूने सपासप वार करून गळा चिरत हत्या केली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
01 Jun 2026 11:15 AM (IST)
भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून त्याचे पडसाद आता दिल्लीतही उमटू लागले आहेत. नेपाळचे (nepal) नवनवीन पंतप्रधान बालेन शाह यांनी संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात भारत-नेपाळ सीमेबाबत एक अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक दावा केला आहे. या विधानामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये अचानक तणाव निर्माण झाला आहे. या मोठ्या वादाच्या पार्श्वभूमीवर, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नेपाळच्या सत्ताधारी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (RSP) अध्यक्ष रवी लामिछाने आज, १ जून २०२६ रोजी, भारताच्या ५ दिवसांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
01 Jun 2026 11:12 AM (IST)
आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यानंतर हॉटेलकडे परतणाऱ्या गुजरात टायटन्सच्या बसला आग लागल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खेळाडू हॉटेलकडे जात असताना ही घटना घडली. सर्व खेळाडूंना बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढून दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आले असले तरी, त्यांना सुमारे एक तास रस्त्यावरच थांबावे लागले. या काळात, चाहते मोठ्या संख्येने जमा होऊ लागल्याने पोलिसांनी खेळाडूंच्या भोवती पहारा दिला. मोहम्मद सिराजनेही रस्त्यावर बसलेला स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
01 Jun 2026 10:51 AM (IST)
अखेर जेईई ॲडव्हांस्ड २०२६ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. आयआयटी रुरकीने १७ मे २०२६ रोजी आयोजित केलेल्या जेईई ॲडव्हांस्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी एकूण १,८७,३८९ उमेद्वारांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी ५६,८८० उमेद्वार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ऑल इंडिया रँकमध्ये पहिला क्रमांक मिळवून ते जेईई ॲडव्हांस्ड २०२६ चे टॉपर बनले आहेत. संपूर्ण भारतात अव्वल आलेल्या शुभमने जेईई मेनमध्येही १०० पर्सेटाईल गुणांसह टॉपर्सच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. जेईई ॲडव्हांस्डचे टॉपर शुभम कुमार कोण आहेत? ते कुठले रहीवासी आहेत? त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत? पहिली रंँक मिळवणाऱ्या शुभमचे माता-पिता काय करतात? शुभमला कोणत्या आयआयटी संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे? चला जाणून घेऊया ..
01 Jun 2026 10:41 AM (IST)
अॅप्पलच्या स्मार्ट ग्लासेससाठीची प्रतीक्षा आता आणखी थोडी वाढणार आहे. ताज्या वृत्तांनुसार, कंपनी २०२७ च्या अखेरपर्यंत ते लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे अॅप्पल स्मार्ट ग्लासेस मेटाच्या रे-बॅन स्मार्टग्लासेस आणि गुगलच्या नुकत्याच सादर केलेल्या ऑडिओ ग्लासेसशी स्पर्धा करतील. अॅप्पल पुढील वर्षाच्या सुरुवातीला हे ग्लासेस लाँच करण्याची योजना आखत होते, परंतु विकासासाठी लागणाऱ्या वेळेमुळे लाँचची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. चला जाणून घेऊया की अॅप्पल स्मार्ट ग्लासेसमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील आणि त्यांची अंदाजित किंमत किती असेल.
01 Jun 2026 10:31 AM (IST)
जालना येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाफराबाद-चिखली मार्गावर सकाळी भीषण अपघात झाल्याचे समोर आली आहे. एका वेगवान येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून कार एका झाडावर आढळली आणि थेट कारने भीषण पेट घेतला. हा अपघात एवढा भीषण होता की कार चालकाला कारमधून बाहेर पाडण्याचीही संधी मिळाली नाही. या भीषण अपघातात कार चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद-चिखली मार्गावर सकाळी घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
01 Jun 2026 10:21 AM (IST)
ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर शिवसेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. शिंदे गटाकडून ठाण्यातून माजी आमदार रवींद्र फाटक यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू होती. विशेषतः हितेंद्र ठाकूर यांचे नावही चर्चेत होते. मात्र, अखेर पक्षाने रवींद्र फाटक यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.
01 Jun 2026 10:11 AM (IST)
मध्य पूर्वेतील सतत बदलणारे भूराजकीय वातावरण आणि अमेरिका-इराण (US-Israel Iran War) यांच्यातील पडद्यामागील शांतता वाटाघाटींदरम्यान इराणमधून अत्यंत मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आपल्या पदाचा राजीनामा सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केल्याचा दावा पाश्चात्य आणि परदेशी प्रसारमाध्यमांनी केला आहे. या वृत्तामुळे जागतिक राजकारणात एकाच वेळी अनेक चर्चांना उधाण आले आहे. तथापि, ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच इराणच्या राष्ट्रपती कार्यालयाने तातडीने अधिकृत निवेदन जारी करून हा दावा पूर्णपणे निराधार आणि हास्यास्पद मीडिया डावपेचांचा भाग असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे.
01 Jun 2026 10:01 AM (IST)
देशभरातील लाखो इंजिनिअरिंग उमेद्वारांची प्रतिक्षा आता संपणार आहे. कारण भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रुरकी १ जून २०२६ रोजी जेईई ॲडव्हांस्ड २०२६ चा निकाल जाहीर करणार आहे. परीक्षेत बसलेले उमेद्वार jeadv.ac.in वर जाऊन आपला स्कोरकार्ड ऑनलाइन पाहू शकतील.
निकालासोबतच अंतिम उत्तरतालिका (फायनल आन्सर-की) जाहीर केली जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करता येईल. जेईई अड्व्हांस्डचा निकाल आयआयटी आणि देशातील इतर नमांकित इंजिनियरिंग संस्थांमधील प्रवेशासाठी महत्त्वाचा मानला जातो.
01 Jun 2026 09:30 AM (IST)
BJP Leader Cheated: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांना केंद्रीय राज्यमंत्री दर्जाचे पद मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २० कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक करण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी ३ भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तक्रारदाराने स्वतः रचलेल्या एका फिल्मी जाळ्यात हे आरोपी रंगेहात अडकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी लौकिक फुलकर नावाच्या एका आरोपीने नितीन भुतडा यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. त्याने केंद्र सरकारच्या ४२ वेगवेगळ्या महामंडळांची यादी, त्यांचे बजेट, मिळणारे वेतन आणि इतर व्हीआयपी सुविधांची माहिती भुतडा यांना पाठवली. यापैकी कोणत्याही ३ महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून थेट नियुक्ती मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले. या मोठ्या पदासाठी २० कोटी ५० लाख रुपये खर्च येईल आणि सुरुवातीला ५ टक्के टोकन रक्कम (अगाऊ रक्कम) द्यावी लागेल, असे आरोपीने सांगितले.
01 Jun 2026 09:20 AM (IST)
Commercial LPG Price Hike: देशात आधीच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती वाढलेल्या असताना, आता केंद्र सरकारने सर्वसामान्यांची आणि व्यावसायिक वर्गाची चिंता वाढवणारा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून (१ जून) व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात (Commercial LPG Cylinder Price Hike) लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडर ४२ ते ५३ रुपयांनी महागला नवीन नियमांनुसार, १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ४२ ते ५३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत आता १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर ३ हजार ११३ रुपयांना मिळणार आहे.कोलकात्यामध्ये हा दर आता ३ हजार २५५ रुपयांवर पोहोचला आहे.५ किलोचा सिलेंडरही ११ रुपयांनी महागला केवळ मोठा व्यावसायिक सिलेंडरच नाही, तर छोट्या व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणाऱ्या ५ किलो वजनाच्या सिलेंडरच्या दरातही ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर ५ किलोचा छोटा सिलेंडर आता ८२१ रुपयांना मिळणार आहे.
01 Jun 2026 09:15 AM (IST)
Arun Lakhani BJP Nominee: आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) भारतीय जनता पक्षाने (BJP) रविवारी आपली ११ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखाणी (Arun Lakhani) यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या उमेदवारीमुळे सध्या राजकीय वर्तुळात कमालीचे आश्चर्य आणि चर्चा व्यक्त केली जात आहे.






