फोटो सौजन्य - Social Media
वाशिम, ब्युरो : राज्य शासनाच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेला वाशिम जिल्ह्यात प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कमी खर्चात पर्यटन, देवदर्शन आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेचा जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या कालावधीत तब्बल २ हजार प्रवाशांनी लाभ घेतला. या माध्यमातून एसटी महामंडळाला ३ लाख ४९ हजार ११२ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, आणखी ४१० प्रवाशांनी नोंदणी केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या या उपक्रमामुळे सामान्य प्रवाशांना स्वस्त दरात अमर्याद प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे तसेच ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी अनेक नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. कमी खर्चात वारंवार तिकीट काढण्याची गरज नसल्याने प्रवास अधिक किफायतशीर ठरत आहे.
चार दिवसांच्या पास सुविधेमुळे लहान सहलींचे नियोजन करणेही प्रवाशांना सोपे जात आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये ४ बसद्वारे १४३० किलोमीटर प्रवास करण्यात आला आणि त्यातून १ लाख ३६ हजार ७७४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मार्च २०२६ मध्ये ६ बसद्वारे १९१० किलोमीटर प्रवासातून १ लाख ३९ हजार ५८२ रुपये मिळाले. तर एप्रिल २०२६ मध्ये ३ बसद्वारे ८२० किलोमीटर प्रवास करून ७२ हजार ७५२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे एकूण उत्पन्न ३ लाख ४९ हजार ११२ रुपये झाले आहे.
या योजनेत साधी, निमआराम, शिवशाही तसेच ई-शिवाई बससेवेचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आता इलेक्ट्रिक बसेसचाही या योजनेत समावेश करण्यात आल्याने प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीत या योजनेला अधिक लाभदायी बनविण्यात आले आहे. आगार प्रमुख अनिरुद्ध मेहेत्रे यांनी सांगितले की, ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचा हजारो प्रवाशांनी लाभ घेतला असून, अल्प दरात सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करण्याची संधी मिळत आहे. प्रवाशांनी एसटीच्या माध्यमातून सहल आणि यात्रा काढून सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.






