संग्रहित फोटो
पुणे : पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांत शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला अलंकार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या आरोपीकडून १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजू बाबूराव जावळकर (वय व ५७, रा. डोणजे फाटा, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम, पोलिस निरीक्षक स्मिता पाटील, उपनिरीक्षक गणेश दीक्षित, पोलिस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, माधुरी कुंभार, राकेश क्षीरसागर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कारची काच फोडून त्यातील ऐवज चोरीच्या घटना वाढल्या होत्या. रस्त्याच्या कडेला व निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून या घटना होत होत्या. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढला. तेव्हा आरोपी राजू जावळकर चोऱ्या करत असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
हे सुद्धा वाचा : मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
सहा गुन्हे केल्याची कबुली
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ६ गुन्हे केल्याचे कबुल केले. त्याच्याकडून ९७.२०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ॲपल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल, रोकड व गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी असा एकूण १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर पुण्यासह, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस
१३ मे रोजी रात्री दिवे घाटात हातात नंग्या तलवारी आणि लोखंडी कोयते घेवून भररस्त्यात नंगानाच करणाऱ्या टोळी विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४० ते ५० बुलेटगाड्या आणि त्यावरील चालक आणि त्यांचे सहकारी अशा एकूण १०० व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावरील कारवाईकडे सर्वांच लक्ष लागले आहे.






