Top Marathi News Today Live
पुणे शहरातून प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत. शहरात आज रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात येत असून, दुसरीकडे महापालिकेने आपल्या वाहनांच्या वाढत्या इंधन खर्चाला चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
पुणे शहरात आज रात्रीपासून (२६ मे) अधिकृतपणे जमावबंदीचे आदेश (Section 144) लागू करण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिकेने याबाबतचे विशेष परिपत्रक जारी केले असून, पुढील १४ दिवसांसाठी ही जमावबंदी कायम राहणार आहे. या आदेशानुसार, जमावबंदीच्या संपूर्ण कालावधीत शहरात कोणत्याही प्रकारची आंदोलने, मोर्चे, निदर्शने आणि जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी असणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे.
26 May 2026 04:50 PM (IST)
पूनम एस्टेट परिसरातील वादाचे प्रकरण आता अधिकच तापले असून एका युवकावर ब्लेड हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना Sandeep Rane यांनी शहराची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी तसेच दोषींवर कठोर पावले उचलावीत, असेही त्यांनी म्हटले.
26 May 2026 04:45 PM (IST)
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, BLO यांनी कोणत्याही सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली न येता निष्पक्षपणे काम करणे गरजेचे आहे. मतदारांनीही या प्रक्रियेबाबत सतर्क राहिले पाहिजे. बंगाल आणि बिहारमध्ये ज्या पद्धतीने शडयंत्र रचले गेले, त्याच धर्तीवर प्रकार येथेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान, कांदा दरघसरण, डिझेल टंचाई आणि खतांच्या उपलब्धतेच्या प्रश्नावरूनही त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कांद्याचे भाव सतत घसरत आहेत, तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पुरेसे डिझेल मिळत नाही. काही पेट्रोलपंपांवर ५०० ते २००० रुपयां पर्यंतच डिझेल दिले जात आहे. पेरणीच्या तोंडावर खतांचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी संकटात सापडला आहे, असे त्या म्हणाल्या.या प्रश्नांवर निषेध नोंदवण्यासाठी उद्या ‘जनआक्रोश रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये भरावे लागत आहेत, मात्र सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक मस्त आहेत आणि शेतकरी मात्र त्रस्त आहे, असा आरोप त्यांनी केला.
26 May 2026 04:40 PM (IST)
उल्हासनगरमध्ये पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. शहरातील पाणी साचणे, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी विविध भागांतील मोठे व लहान नाले साफ केले जात आहेत. गाळ, प्लास्टिक कचरा आणि अडथळे हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनाही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ही मोहीम वेगाने राबवली जात आहे.
26 May 2026 04:35 PM (IST)
केंद्रातील मोदी सरकारला यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी जनसंवाद, विकासकामांचा आढावा तसेच नागरिकांच्या समस्यांवर मंथन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची माहिती, विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि स्थानिक प्रश्नांवर उपाययोजनांबाबत संवाद साधला जात आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमांना मिळत असून जिल्ह्यात राजकीय वातावरणही चांगलेच रंगले आहे.
26 May 2026 04:25 PM (IST)
भिवंडीमध्ये विविध शासकीय कागदपत्रांच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आधारकार्ड, रेशनकार्ड तसेच जातीचे दाखले नसल्यामुळे अनेक नागरिक शासकीय योजनांपासून आणि मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या आंदोलनादरम्यान संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळावीत आणि त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले.
26 May 2026 04:20 PM (IST)
मान्सूनची चाहूल लागली असून देशभरातील नागरिकांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या शाखांमधून भारतभर कसा पाऊस पाडतात, याची माहिती या विशेष रिपोर्टमधून जाणून घेऊया. एकीकडे महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असताना, तर दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे संकेत दिसू लागले आहेत.
26 May 2026 04:15 PM (IST)
विरार महानगरपालिकेच्या बोळींज रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि गटनेते अशोक शेळके यांनी विरार पश्चिम येथील बोळींज रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
26 May 2026 04:10 PM (IST)
एम एस ई बी च्या वतीने सांगली जिल्ह्यामध्ये जबरदस्तीने डिजिटल मीटर्स बसवण्यात येत असून याबद्दल ग्राहकालाही पूर्व सूचना दिली जात नसल्याने तसेच सर्वसामान्य ग्राहकाला भरमसाठ बिले येत असल्याने या विरोधात आज मिरज शहर उबाठा शिवसेनेच्या वतीने एम एस ई बी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत बिलांच्या होळीसह प्रतिकात्मक मीटरची होळी करण्यात आली.एम एस ई बी ने हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा जबरदस्तीने मीटर ग्राहकांच्या माथी मारू नयेत अन्यथा मीटर्स बसवण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना चाबकाने फोडून काढू अशातऱ्हेचा इशारा देण्यात आलाय.
26 May 2026 04:10 PM (IST)
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना वाढीव वीज बिलाचा फटका बसला असेल. मात्र, आता या बिलाचं टेन्शन आता संपण्याची शक्यता आहे. कारण, स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफ टॉप स्मार्ट सोलर योजना आणली जात आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने ही योजना आणली आहे. स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफ टॉप स्मार्ट सोलर या योजनेंतर्गत आता सर्वसामान्य नागरिकांना अवघ्या २५०० ते १०००० रुपयांच्या किरकोळ गुंतवणुकीत आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा (सोलर पॅनेल) बसवता येणार आहे. वाचा सविस्तर
26 May 2026 04:01 PM (IST)
वाढती महागाई आणि सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोखा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, सरकारने तातडीने दरवाढ नियंत्रणात आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून बैलगाडी, सायकल आणि गाढवाच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत टीका केली. खाजगी कंपन्यांकडून बांगलादेश आणि नेपाळला पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत असल्यामुळे देशात कृत्रिम टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
26 May 2026 03:55 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या विविध विभागांना पूर्वीपासूनच पाच दिवसांचा आठवडा आहे. आता तर मध्यपूर्व देशांत युद्ध सुरू झाल्यापासून अनेक देशांनी चार ते पाच दिवसांचा आठवडा शाळांना सुरू केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील देखील सर्व प्राथमिक शाळांना जूनपासून पाच दिवसांचा आठवडा सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने राज्य शासनाकडे केली आहे. वाचा सविस्तर
26 May 2026 03:45 PM (IST)
एक खळबळजनक वृत्त मिळाले आहे. इराणने अमेरिकवेर युद्धादरम्यान इराणी नागरिकांवर नवीन शस्त्राचा वापर केल्याचा आरोप केला आहे. इराणछ्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी, २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या हल्ल्यात २४ लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये नव्या शस्त्राचा वापर करण्यात आला असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, अमेरिकेने या हल्ल्यात एअरबर्स्ट क्षेपणास्त्राचा वापर केला होता. ज्यामुळे प्रचंड विध्वंस झाला.
During a meeting with Dr. Mousa Mousavi, the member of Parliament for Mehr & #Lamerd, I was briefed on the harrowing details of a devastating American missile strike on a sports hall in the city of Lamerd, Fars Province.
On the afternoon of Saturday, 9 Esfand 1404 (28 February… https://t.co/tHr7g6gPIv
— Esmaeil Baqaei (@IRIMFA_SPOX) May 25, 2026
26 May 2026 03:35 PM (IST)
राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. आखाती देशांतील युद्ध आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कांद्याचा खर्चहि निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. यावरून आता महाविकास आघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात आले असून कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. वाचा संपूर्ण प्रकरण
26 May 2026 03:25 PM (IST)
Tatkal Ticket booking rules: पश्चिम रेल्वेच्या कोटा विभागाने तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेच्या नियमात काही महत्त्वाचे बदल केल्याची माहिती समोर आली आहे. तिकीट प्रकिया सुधारण्यासाठी, पश्चिम मध्य रेल्वेच्या (WCR) कोटा विभागाने आपल्या सर्व स्थानकांवर टोकन प्रणाली सुरू केली आहे. या निर्णयाचा उद्देश प्रवाशांची सोय वाढवणे, पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि तिकीटाच्या ठिकाणी लागणाऱ्या लांब रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिल १९५२ रोजी स्थापन झालेला कोटा विभाग हा पश्चिम रेल्वेच्या (WIR) सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक मानला जातो. त्याचे भौगोलिक क्षेत्र प्रामुख्याने राजस्थानपर्यंत विस्तारलेले असून, त्याचे काही भाग मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही येतात. जाणून घ्या
26 May 2026 03:15 PM (IST)
Quad Summit news in Marathi : नवी दिल्लीत मंगळवारी, २६ मे २०२६ रोजी क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी भूषवले. यावेळी जयशंकर यांनी हिंद-प्रशांत महासागरातील (इंडो-पॅसिफिक) सागरी सुरक्षा आणि आर्थिक विकासावर इतर नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. हैदराबाद हाऊस येथे पार पडलेल्या या हाय-प्रोफाइल बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वँग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी उपस्थित होते. या बैठकीवर तीन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर
26 May 2026 02:59 PM (IST)
जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित होईल या उद्देशानं सोमवारी शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी पहायला मिळाली होती. पण जागतिक स्तरावर पुन्हा अंदाधुंद परिस्थिती माजली असल्याने शेअर बाजार बराच घसरलेला पाहायला मिळत आहे. आज, मंगळवार, २६ मे रोजी शेअर बाजार लाल रंगानं ओपन झाला. बाजार उघडताच, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक, ‘BSE सेन्सेक्स’, सुमारे १७५.४९ अंकांनी घसरून ७६,३१३.४७ च्या पातळीवर पोहोचला. दरम्यान, ‘निफ्टी ५०’ ची सुरुवातही घसरणीसह झाली; ४२ अंकांनी खाली येत हा निर्देशांक २३,९८९.२० च्या पातळीवर सुरु झाला.
26 May 2026 02:49 PM (IST)
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या विधवा महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याचे समोर आले आहे. उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला तेव्हा ही घटना समोर आली. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे रविवारी घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
26 May 2026 02:40 PM (IST)
साताऱ्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा शहरालगत असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांनी कथित १६ लाख ७७ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. खेडच्या लोकनियुक्त सरपंच लता फरांदे यांना दोषी ठरवत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडलवार यांनी पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शासन परिपत्रकानुसार आवश्यक पडताळणी करून लता फरांदे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
26 May 2026 02:29 PM (IST)
भारतातील बहुतांश राज्यामध्ये सध्या प्रचंड उष्णता जाणवत आहे. काही राज्यामध्ये तापमान इतके प्रचंड आहे की, दुपार आणि सायंकाळचे बाहेर पडणेसुद्धा अवघड होत आहे. अशा तापमानात दिवसभर बाहेर रहावे लागले तर किती कठीण होईल. परंतु, ‘गिग वर्कर्स’ (डिलिव्हरी बॉईज, चालक इ.) नेमकी याच प्रकारची नोकरी करत आहेत. या भीषण उष्णतेत गिग वर्कर्स तासन्तास काम करत आहेत. या कामगांरांबाबत आयआयटी दिल्लीच्या एका अभ्यासात खुलासा करण्यात आला आहे.
26 May 2026 02:20 PM (IST)
शरद पवार यांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आपली मुलगी रेवती सुळेच्या लग्नाचे आमंत्रण दिले. यावेळी त्यांचे होणारे व्याही अरुण लखानी आणि जावई सारंग लखानी हेही उपस्थित होते. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, पण अवघ्या २४ तासांनंतर सुप्रिया सुळे यांचा सूर पूर्णपणे बदलला असल्याचेही दिसून आले.
एका बाजूला मुलीच्या लग्नाचे आमंत्रण सविस्तर दिले आणि दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांनी सोमवारी त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींसोबतच्या भावनिक आणि कौटुंबिक भेटीच्या दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. वाढत्या इंधन दरांवर टीका करताना त्या म्हणाल्या की, देश सध्या एका संघर्षात अडकला असून संकटातून जात आहे अशी जोरदार टीका त्यांनी केली
26 May 2026 02:12 PM (IST)
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या पोटच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घडलेली घटना कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
26 May 2026 02:05 PM (IST)
चांदवडमध्ये आंदोलनादरम्यान गोंधळ झाला आहे. यामुळे चांदवड चौफुलीवर मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प झाला आहे, शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतला असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे आहे. उद्या याबाबत दिल्ली येथे बैठक होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
26 May 2026 01:57 PM (IST)
नाशिकच्या चांदवड इथल्या मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विराट क्रांती महामोर्चा काढलाय. कांद्याला प्रति क्विंटल किमान 2 हजार रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखलाय. या मोर्चामध्ये ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सहभागी झालेत. मेलोडी चॉकलेट वाटत शेतकऱ्यांनी निषेध केला.
26 May 2026 01:02 PM (IST)
सत्तेत आल्यास पेट्रोल डिझेल ३५ रुपये लिटरने देऊ अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा करणारे मागील १२ वर्षापासून सत्तेत असताना पेट्रोल-डिझेल-एलपीजी सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. मागील ११ दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवलेल्या आहेत. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईने पिचलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून, सरकारने तात्काळ मागे घ्यावी आणि महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर जनतेत तीव्र संताप आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी व जनतेची सुरु असलेली लूट थांबवावी या मागणीसाठी काँग्रेस पक्ष विविध विभाग, सेल व संघटनांच्या माध्यमातून उद्या मंगळवार दिनांक २६ मे २०२६ पासून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे.
26 May 2026 12:48 PM (IST)
बाणेर-बालेवाडी परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हा केवळ तांत्रिक बिघाडाचा प्रश्न नसून रखडलेल्या सबस्टेशन प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या गंभीर नियोजन शून्यतेचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयटी हब म्हणून वेगाने विस्तारत असलेल्या या भागात वीजेची मागणी झपाट्याने वाढत असताना, नवीन सबस्टेशन उभारणीला होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना पुढील पाच ते सात वर्षे अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागू शकतो.
26 May 2026 12:36 PM (IST)
पुरंदर विमानतळ प्रकल्प भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे. अनेक शेतकरी स्वतःहून संमतीपत्रे देत असून त्यापोटी मिळणारा मोबदला घेणे आणि पैसे लगेचच कुठे गुंतवणूक करता येतील या प्रक्रियेत व्यस्त आहेत. त्याचवेळी स्थानिक अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील फळपिके, इतर झाडे, शेत तळे यांच्या नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकरी आता नोंदी करून घेण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहेत. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निमित्ताने जमिनीची संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून त्यामध्ये असलेली वेगवेगळी झाडे, फळ पिके, विहीर, शेत तळे, बोअर, पत्राशेड, गोठे, यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना क्रमांक देवून त्याप्रमाणे त्याची एक प्रत संबंधित शेतकऱ्यांना दिलेली आहे.
26 May 2026 12:24 PM (IST)
वाढता उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित भाव, अपुरा वीजपुरवठा आणि नैसर्गिक संकटांच्या छायेमुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा आणि किमान आधारभूत किंमत (MSP) कायद्याने बंधनकारक करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सध्या रासायनिक खते, औषधे, बियाणे, डिझेल आणि मजुरीचे दर प्रचंड वाढले आहेत. मात्र त्यानुसार शेतीमालाचे दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कांदा, टोमॅटो, सोयाबीन, फ्लॉवर, कोबी, केळी यांसारख्या नगदी पिकांमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करूनही उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
26 May 2026 12:12 PM (IST)
स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहून तिला लग्न करण्याचे वचन दिले. पण, उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर सलग दोन वर्षे तरुणीला टाळटाळ करून तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून आता उपनिरीक्षक झालेल्या या तरुणावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव स्वदेश विजय चव्हाण (वय ३१) असे आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात ३१ वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे.
26 May 2026 12:00 PM (IST)
SAIL Recruitment 2026: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबरी आहे. ‘स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’कडून यंगप्रोफेशन भर्ती अंतर्गत एकूण ४८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ‘अलॉय स्टील प्लांट’, ‘दुर्गापूर स्टील प्लांट’ आणि ‘आयआयएससीओ (IISCO) या वेगवेगळ्या प्लांटसाठी केली जाणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेद्वारांनी ६ जून २०२६ पर्यंत अर्ज करावेत.
26 May 2026 11:50 AM (IST)
कोलकातामध्ये गाडीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या अत्याचाराचे चित्रीकरणही केले आहे.
26 May 2026 11:40 AM (IST)
टेक कंपनी Oppo ने त्यांच्या लोकप्रिय Reno सिरीजअंतर्गत दोन नवीन 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Oppo Reno 16 आणि Reno 16 Pro हे स्मार्टफोन्स प्रीमियम डिझाइन, दमदार कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह बाजारात दाखल झाले असून टेक जगतात त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
26 May 2026 11:35 AM (IST)
मुळा-मुठा नदीतील वाढत्या जलपर्णीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी चक्क अंगावर जलपर्णी परिधान केली होती. "मी पुण्यातली जलपर्णी… मला कधी काढणार?" अशा आशयाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला.
26 May 2026 11:30 AM (IST)
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची भररस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. आरोपी ऋषिकेश पाटीलने पत्नी धनश्रीवर तब्बल 50 वार केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
26 May 2026 11:20 AM (IST)
इस्रायल-हिजबुल्लाह संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. इस्रायलने हिजबुल्लाहची लष्करी ताकद संपुष्टात आणण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. हिजबुल्लाहच्या लेबनॉनमधील १० कमांड सेटंर्सना उडवून टाकण्यात आले आहे. तसेच दोन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला आहे.
26 May 2026 11:15 AM (IST)
घडलं असं की, महिला खुल्या आकाशात पॅराशूटच्या मदतीने पॅराग्लायडिंगचा आनंद लुटत होती पण याचदरम्यान एक विमान महिलेच्या पॅराशूटला येऊन धडकले. विमानाला तर काही झाले नाही पण या धडकेमुळे महिलेचे पॅराशूट फाटले ज्यामुळे हवेतच तिचा तोल ढासळू लागला. यानंतर महिला घाबरली आणि आकाशातच आपल्या बचावासाठी तिची धडपड सुरु झाली. ही संपूर्ण घटना आता कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.
26 May 2026 11:07 AM (IST)
आजच्या काळात शिक्षणाचा खर्च सातत्याने वाढत चालला आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासात हूशार असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करणे कठीण होत आहे. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ‘पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना’(PM YASASVI) राबवण्यास सुरुवात केली आहे.
26 May 2026 10:55 AM (IST)
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मोठे राजकीय धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी आणि पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी आणखी एका राजकीय पक्षाचे थेट शिंदेसेनेत विलीनीकरण करण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा रंगली आहे. या नव्या राजकीय घडामोडींमुळे शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांची उमेदवारी रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फाटक यांच्या जागी क्षितीज ठाकूर यांची अनपेक्षित एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
26 May 2026 10:45 AM (IST)
Fuel Crisis in Maharashtra: सध्या राज्यातील इंधन टंचाईमुळे शालेय वाहतूक व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे. नव्या शैक्षणिक वर्षांची तयारी सुरू असताना डिझेल आणि पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली असून याचा थेट परिणाम आता शाळांच्या कामकाजांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधन टंचाई आणि वाढत्या महागाईचा मेळ घालण्यासाठी मुंबईतील स्कूल बस असोसिएशनने (SBOA) सरकारकडे एक मागणी केली आहे.
26 May 2026 10:35 AM (IST)
नवा विवो वाय 600 टर्बो स्मार्टफोन 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 40,000 रुपये आहे. हा नवीन स्मार्टफोन ड्यून गोल्ड, इलेक्ट्रिक ब्लू आणि मिलेनियम पिंक या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईस प्री-ऑर्डरसाठी चीनमध्ये उपलब्ध आहे आणि या डिव्हाईसची पहिली विक्री 27 मेपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
26 May 2026 10:25 AM (IST)
वॉशिंग्टन/तेहरान : आखातात पुन्हा अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (२६ मे) पहाटेच्या सुमारास अमेरिकन लष्कराने इराणवर मोठा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या लष्करी तळावर जोरदार हवाई हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे भीषण युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या या लष्करी कारवाईने शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
26 May 2026 10:15 AM (IST)
सातारा शहरालगतच्या खेड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सरपंच लता फरांदे यांना पदावरून हटवण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. ग्रामनिधीच्या वापरात गंभीर अनियमितता आणि लाखो रुपयांच्या अपहाराच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
26 May 2026 10:05 AM (IST)
कोलकातामध्ये राहणाऱ्या या तरुणाने आपली अनोखी क्रिएटिव्हिटी दाखवत बाईकला असे माॅडिफाय केले की लोक पाहून दंग झाली. या बाईकची रचना एका सांगाड्यासारखी करण्यात आली होती. हिला पाहून असं वाटलं जणू ही खरोखरची ‘घोस्ट राइडर’ बाईक आहे. या बाईकला जीत नावाच्या तरुणाने तयार केले होते. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याने याचा व्हिडिओ शूट केला आणि बाईकला चालवून देखील दाखवले. बाईक इतकी अनोखी होती की रस्त्यावरची लोक याचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद करताना दिसली.
26 May 2026 09:30 AM (IST)
Rohit Sharma Padma Award: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या चाहत्यांसाठी सोमवारचा दिवस थोडा आश्चर्याचा आणि चिंतेचा ठरला. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य पद्म पुरस्कार सोहळ्यात रोहित शर्मा उपस्थित राहू शकला नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच रोहितला देशातील चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी म्हणजेच 'पद्मश्री' पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. त्यामुळे तो या सोहळ्याला का आला नाही, यावरून आता क्रीडा वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
रोहित शर्मा या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नसला, तरी तो या प्रतिष्ठेच्या पुरस्कारापासून मुकलेला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्कार सोहळे सहसा एकाच वेळी न घेता अनेक टप्प्यांमध्ये आयोजित केले जातात.
26 May 2026 09:25 AM (IST)
US Iran War Update: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भीषण भडका उडाला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी (Ceasefire) आणि शांतता कराराबाबत सकारात्मक चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेने इराणवर "सेल्फ-डिफेंस स्ट्राईक" (Self-Defense Strike) म्हणजेच आत्मरक्षेसाठी मोठा लष्करी हल्ला केला आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील शांतता प्रक्रिया आणि कराराच्या आशा पुन्हा एकदा पूर्णपणे धूसर झाल्या आहेत.
26 May 2026 09:20 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका, इस्त्रायल या देशांतील संबंध चांगलेच ताणल्याचे दिसून येत आहे. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या देशांकडून हल्ले करण्यात आले होते. त्याला इराणनेही प्रत्युत्तर दिले. मात्र, या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून मध्यस्थीची भूमिका घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पाकिस्तान अशा पेचात सापडला आहे, जिथे सहमत होऊनही तो अडकेल आणि नकार दिल्यास आणखी मोठ्या संकटात सापडेल.
आठवड्याच्या अखेरीस, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसह अनेक देशांसोबत एक उच्चस्तरीय कॉन्फरन्स कॉल आयोजित केला होता. इराण युद्धानंतर ट्रम्प यांनी शक्य तितक्या मुस्लिम देशांना अब्राहम करारात सामील होण्याचे आवाहन केले, ज्याचा अर्थ मूलतः इस्रायलला औपचारिक मान्यता देणे असा होतो. वृत्तानुसार, या प्रस्तावानंतर कॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानसह इतर देशांना अजूनही तयार आहेत का? असा प्रश्न विचारला.
26 May 2026 09:15 AM (IST)
Fuel Crisis: राज्यामध्ये सध्या जाणवणाऱ्या तीव्र इंधन टंचाईच्या संकटामुळे शालेय वाहतूक व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे। नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू असतानाच डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दरांनी शाळा आणि वाहतूकदारांची डोकेदुखी वाढवली आहे। याचा थेट परिणाम आता शाळांच्या नियमित कामकाजावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या इंधन टंचाई आणि वाढत्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी मुंबईतील 'स्कूल बस ओनर्स असोसिएशन'ने (SBOA) सरकारकडे एक अजब आणि धक्कादायक मागणी केली आहे. वाढत्या इंधन दरांचा थेट आर्थिक भार पालकांवर पडू नये आणि दुसरीकडे बस चालकांचे होणारे नुकसान टळावे, यासाठी असोसिएशनने 'दिवसाआड शाळा' भरवण्याचे एक नवीन मॉडेल सरकारला सुचवले आहे।
26 May 2026 09:10 AM (IST)
NEET UG Scam: डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून लातूर आणि पुण्यासारख्या महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक शहरांमध्ये येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यातील ज्या प्रसिद्ध कोचिंग संस्थांवर विश्वास ठेवून पालक आपली जमीन गहाण ठेवतात किंवा कर्ज काढतात, त्याच यंत्रणेतील काही मोठे घटक आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नीट (NEET-UG) परीक्षेतील गैरप्रकारांचा तपास आता केवळ पेपर फुटीपुरता मर्यादित राहिलेला नाही; तर या तपासामुळे राज्यातील संपूर्ण कोचिंग अर्थव्यवस्थेचे धाबे दणाणले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाला सर्वात मोठी कलाटणी मिळाली, ती लातूरमधील सुप्रसिद्ध 'आरसीसी' (RCC) क्लासेसचे मालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर. मोटेगावकर यांच्या अटकेने शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांचे धागेदोरे किती खोलवर पसरले आहेत, हे स्पष्ट केले आहे.
26 May 2026 09:05 AM (IST)
Fuel Crisis: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या राजकीय तणावामुळे जागतिक स्तरावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षाचा थेट फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत असून, संपूर्ण जगावर आतापर्यंतचे सर्वात मोठे ऊर्जा संकट घोंगावू लागले आहे.
दोन्ही देशांमधील वादामुळे जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) बंद करण्यात आली आहे. परिणामी, आखाती (अखाती) देशांमधून होणारा कच्च्या तेलाचा (Crude Oil) आणि एलपीजी (LPG) गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा आखाती देशांतून आयात करत असल्याने, देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
26 May 2026 09:00 AM (IST)
Eknath Shinde Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळात अत्यंत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी शिंदे गटातील काही प्रमुख नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता आणि नाराजी असल्याचे संकेत मिळत असून, याचाच फायदा उठवत उद्धव ठाकरे गटाकडून या नेत्यांशी थेट संपर्क साधला जात असल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर राज्यात सत्तांतर झाले. मात्र, त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सातत्याने उपेक्षा होत असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटातीलच काही नाराज नेत्यांनी केला आहे. या अंतर्गत धुसपुशीमुळे काही माजी मंत्री आणि विद्यमान आमदारांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
26 May 2026 08:55 AM (IST)
Stock Market Update: सोमवारी भारतीय शेअर बाजाराच्या (Indian Equity Benchmarks) सकाळच्या सत्रात मोठी तेजी पाहायला मिळाली. बाजारातील या सकारात्मक वातावरणामुळे मुख्य निर्देशांक असलेल्या 'निफ्टी ५०' ने (Nifty 50) १.०९ टक्क्यांची मजबुती दर्शवत २३,९७८.५० अंकांवर झेप घेतली.
या तेजीच्या सत्रात प्रामुख्याने नूतनीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या केंद्रस्थानी होते. 'एनटीपीसी ग्रीन एनर्जी'ने आपल्या चौथ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर केल्यानंतर या स्टॉकवर बाजाराचे विशेष लक्ष होते.






