
Top Marathi News Today Live
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. सूत्रांनुसार, दिल्ली पोलिसांचे पथक अभिजीत यांना विमानतळावर थांबवणार नाही. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कुठेही जाण्याची परवानगी दिली जाईल.
06 Jun 2026 06:00 PM (IST)
Petrol-Diesel Price Hike: इराणमधील संघर्ष आणि पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या एका महिन्यात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चार वेळा वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर एकूण ७.५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे झालेली ही दरवाढ तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर झाली आहे. पण अजूनही परिस्थिती निवळलेली नाही. आजही तणाव कायम असल्याने पुन्हा पेट्रोल – डिझेलचे भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे ५.५ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ४.५ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या कंपन्यांना एकत्रितपणे दररोज ५५० ते ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा होत आहे ही अशी स्थिती आहे जी दीर्घकाळ टिकवून ठेवणे शक्य नाही.
06 Jun 2026 05:45 PM (IST)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे ६ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. नीट पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असताना अनेक सेलिब्रिटीदेखील त्यांच्यासोबत उभे राहताना दिसत आहेत.
06 Jun 2026 05:30 PM (IST)
avitra Portal Ashramshala shikshak Bharti: राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया आता ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील इतर मार्गदर्शक सूचना मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक सोनाली मुळे यांनी जारी केल्या आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये विजाभज (विमुक्त जाती व भटक्या जमाती )प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांचा यामध्ये समावेश आहे.
06 Jun 2026 05:20 PM (IST)
Punjab Accident: पंजाबमधून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. फिरोजपुर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. फिरोजपूर-फाजिल्का रस्त्यावर पिकअप आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. या भीषण दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जलालाबाद येथील एकाच कुटुंबातील 32 जण पहाटेच्या सुमारास पिकअप गाडीने प्रवास करत होते. त्यांच्या कुटुंबातील एका महिलेचे निधन झाल्याने त्यांच्या अस्थींचे विसराजन करण्यासाठी ते निघाले होते. अपघातानंतर ट्रक चालक गाडी सोडून घटनास्थळावरून पळून गेला आहे. फरार झालेल्या ड्रायव्हरचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
06 Jun 2026 05:10 PM (IST)
बहुप्रतिक्षित निसान टेक्टॉन अखेर पुढील महिन्याच्या ९ तारखेला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. ही गाडी रेनॉल्ट डस्टरशी स्पर्धा करेल आणि यामध्ये अनेक प्रीमियम फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. या एसयूव्हीला एक दमदार ‘टॉल-बॉय’ लुक असेल. एका टीझरमधून असे दिसून येते की, या गाडीमध्ये मोठी ग्रिल आणि कनेक्टेड लाइटबार सेटअप असू शकतो, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर निसानच्या फ्लॅगशिप मॉडेल्समध्ये आढळतो. या एसयूव्हीमध्ये साधे सिल्व्हर क्लॅडिंग आणि एक आकर्षक बोनेट असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तिचा दणकट लुक आणखी वाढेल.
06 Jun 2026 05:00 PM (IST)
चेन्नईस्थित प्रतिष्ठित वस्त्र ब्रँड सुंदरी सिल्क्स इंडिया ८ आणि ९ जून 2026 रोजी मुंबईतील बांद्रा वेस्ट येथील कॅशे – द आर्ट्स अँड क्राफ्ट्स गॅलरी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या दोन दिवसीय ‘साडी मेला 2026’च्या माध्यमातून भारतीय हातमाग परंपरेचे सौंदर्य मुंबईकरांसमोर सादर करणार आहे.या प्रदर्शनात हस्तकलेने विणलेल्या उत्कृष्ट साड्या आणि वारसा जपणाऱ्या विशेष संग्रहांचे प्रदर्शन करण्यात येणार असून, भारतीय वस्त्रकलेचे सौंदर्य आणि आकर्षण एकाच छताखाली अनुभवण्याची संधी मुंबईतील ग्राहकांना मिळणार आहे.
06 Jun 2026 04:57 PM (IST)
संपूर्ण राज्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पावसाळा कधी सुरू होणार याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मात्र आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकणात पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यांसाह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पावसाळा सुरुवात होणार आहे. लवकरच मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
06 Jun 2026 04:45 PM (IST)
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडन येथील व्याख्यानाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. ४ जून रोजी लंडनच्या बर्कबेक विद्यापीठात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयावरील व्याख्यानानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. सीजेआय सुर्यकांत यांनी काही दिवसांपूर्वी देशातील तरुणांना ‘झुरळ’ संबोधत त्यांच्यावर उपहासात्मक टिका केली होती. त्याच मुद्द्यावरून लंडनमंधील विद्यार्थ्यांनी भारतातील तरुणांबाबत केलेल्या ‘झुरळ’ वक्तव्यावर आणि भारतातील असंतोषाच्या आवाजावर प्रश्न उपस्थित केल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. त्यांच्या याच विधानावरुन विद्यार्थ्यांनी सुर्यकांत यांना प्रश्न विचारत घेराव घातला.
06 Jun 2026 04:33 PM (IST)
मालनगाव धरणातून काननदी किनारी असलेल्या 17 गावांना पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे या मागणीसाठी मालनगाव धारणामध्ये काँग्रेसच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे, धरणातील जवळपास कमरेभर पाण्यामध्ये काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी या जलसमाधी आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवत प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला आहे.
06 Jun 2026 04:23 PM (IST)
केंद्र सरकारने रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' अंतर्गत अॅग्रीस्टॅक प्रणाली, शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) आणि नवीन एल-वन (L-1) ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री अनिवार्य केली आहे. मात्र, या प्रणालीतील किचकट अटी आणि तांत्रिक त्रुटींमुळे ग्रामीण भागातील शेतकरी पुरता कोलमडला असून, ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून राज्य सरकारने ॲानलाईन खतविक्री शिथील करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
06 Jun 2026 04:15 PM (IST)
पुण्यातील मनोज जरांगे समर्थक अर्चना शहा आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये आज चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली आहे. लक्ष्मण हाके पत्रकार संघातून पत्रकार परिषद आटोपून आल्यानंतर अर्चना शहा यांनी मनोज जरांगे यांच्याविषयी लक्ष्मण हाकेंना प्रश्न विचारल्यानंतर दोघांमध्ये चांगली शाब्दिक बाचाबाची झाली आहे. तुम्ही मनोज जरांगे यांच्यावर चिखल फेक का करता? त्यामुळे समाजातील निर्माण होतो, असं प्रश्न मी लक्ष्मण हाके यांना विचारल्यानंतर त्यांनी माझ्यावर चिडण्यास सुरुवात केली असा दावा अर्चना शहा यांनी केला आहे.
06 Jun 2026 03:59 PM (IST)
नांदेड येथून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर ३ वर्षीय चिमुकला कारखाली चिरडल्याचे समोर आले आहे. आई वडिलांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून अचानकपणे घडलेल्या या घटनेनं सर्वांना मोठा धक्का बसला.
06 Jun 2026 03:46 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली Virat Kohli अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्याने चाहते निराश झाले होते. परंतु आता आणखी एका बातमीने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. वृत्तानुसार, कोहली आगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. आयपीएल 2026 फायनलदरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. आता ही दुखापत अधिक गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार, ही दुखापत त्याला किमान सहा आठवडे मैदानाबाहेर ठेवू शकते.
06 Jun 2026 03:33 PM (IST)
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET)च्या पुनर्परीक्षेबाबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश देले आहेत. येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षा राज्याभरात पूर्ण पारदर्शक, सुरक्षा आणि सुरळीत व्यवस्थेसह पार पाडली जावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही त्रासा्ला सामोरे जावे लागू नये असे म्हटले आहे. एका बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, परीक्षा प्रक्रियेची निष्पक्षता टिकवून ठेवणे ही सर्व संबंधित विभागांची जबाबदारी आहे. परीक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहता कामा नये आणि प्रत्येक स्तरावर देखरेख मजबूत केली जावी, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
06 Jun 2026 03:19 PM (IST)
सरकारी मालकीच्या दोन प्रमुख आणि महत्त्वाच्या कंपन्या BHEL Bharat Heavy Electricals Ltd आणि SAIL Steel Authority of India Ltd यांना सरकारकडून थेट अल्टीमेटम देण्यात आला आहे. या कंपन्यांचा ‘महारत्न’ दर्जा धोक्यात असल्याचंही बोललं जात आहे. केंद्र सरकारने या दोन्ही कंपन्यांना एक वर्षाची नोटीस बजावली आहे.
06 Jun 2026 03:08 PM (IST)
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या बैठकीत भारतीय नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकांसाठी तसेच सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या निवडीत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयपीएल २०२६ मधील धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर वैभवला भारतीय वरिष्ठ संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरची भारतीय टी-२० संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
06 Jun 2026 02:59 PM (IST)
'विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावर भाजपने तोंड उघडायला लावू नये. घोडेबाजार झाला आहे, हे सर्वांना माहिती आहे. फक्त पैशांच्या जीवावर कोणीही उड्या मारू नये. विधान परिषद निवडणुकीत कोणतीही रंगत नव्हती,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
06 Jun 2026 02:52 PM (IST)
ऊर्जा सुरक्षा दिशेने भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा सापडला आहे. आता भारताला मोठा वायू साठा सापडल्यामुळे भारत इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भतेच्या दिशेने वाटलाच करु शकतो. अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा महत्त्वपूर्ण शोध लागला असून भारताच्या ऊर्जा सुरक्षा दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे.
06 Jun 2026 02:41 PM (IST)
शिवसेना UBTचे माजी आमदार वैभव नाईक पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. वैभव नाईकांची पुन्हा एसीबी चौकशी होणार का असा सवाल उपस्थित होतो. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसीबीचं कणकवली नगरपंचायतीला पत्र आलं आहे. वैभव नाईकांनी खरेदी केलेल्या गाळ्यांची माहिती मागवली गेली. २००२ आणि २००६ मध्ये वैभव नाईकांनी गाळ्यांची खरेदी केली होती. २०२२ सालापासून वैभव नाईक यांची अपसंपदा प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फेत चौकशी सुरु आहे.
06 Jun 2026 02:31 PM (IST)
Vijay Wadettivar on OBC : 'सरकारची भूमिका ओबीसींच्या बाजूने नाही' सरकारची भूमिका ओबीसींची मतं घेण्यापुरती' काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सर्वांना सवलती, ओबीसी स्पर्धेत कसा टिकेल?' असा सवालही विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला.
06 Jun 2026 02:20 PM (IST)
विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी घोडेबाजार केल्याचा विरोधकांनी गंभीर आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात. निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत. निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांचं बिल आणल्यास आपण त्याचे स्वागत करू, असे मोठं विधान केलं आहे.
06 Jun 2026 02:09 PM (IST)
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषद निवडणुकीतील कथित घोडेबाजारावरून नाराजी व्यक्त करत राजकारणातील प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्याला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर देत, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर वडेट्टीवारांनी स्वतः कोणती भूमिका घेतली होती, असा सवाल उपस्थित केला. यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
06 Jun 2026 02:00 PM (IST)
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी ‘वी द लीडर्स’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. हा नवीन पक्ष आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे.सुमारे सहा वर्षे भाजपसोबत जोडलेले राहिलेल्या अण्णामलाई यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, तमिळनाडूमध्ये एका नव्या प्रकारच्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी त्यांनी अत्यंत सन्मानपूर्वक पद्धतीने भाजप सोडली आहे. यादरम्यान त्यांनी एक मोठा खुलासा करताना सांगितले की, ते गेल्या वर्षीच भाजप सोडणार होते, परंतु काही कारणांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.
06 Jun 2026 01:55 PM (IST)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत साकारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे विमानतळ परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळाली आहे. या अनावरण सोहळ्याला विविध मान्यवर, स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
06 Jun 2026 01:50 PM (IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कॉकरोच जनता पार्टीची ’ (CJP) चर्चा सर्वत्र रंगली आहे.या संघटनेच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ज्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. या सगळ्या लोकांमध्ये या पार्टीचे प्रमुख चेहरे आणि प्रवक्ते यांच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. म्हणून आज आपण कॉकरोच जनता पार्टीचे तिन्ही प्रवक्ते आणि त्यांचे शिक्षण याबद्दल माहिती घेणार आहोत..
06 Jun 2026 01:45 PM (IST)
केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता DA आणि महागाई सवलत DR बाबतच्या निर्णयाची दीर्घकाळापासून वाट पाहत असतानाच एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. सरकारने आपल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीत २ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
06 Jun 2026 01:43 PM (IST)
कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष बनेल की नाही, हे सध्या अनिश्चित आहे. या पक्षाला सोशल मीडियावर प्रचंड जनसमर्थन आहे. तथापि, देशात असे सहा पक्ष होऊन गेले आहेत, जे सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारांना विरोध करून प्रसिद्धीस आले आहेत आणि राजकीय पक्ष बनले आहेत.
06 Jun 2026 01:35 PM (IST)
आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेजारील देश पाकिस्तानसमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. आता पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून एक अत्यंत चिंताजनक वृत्त समोर आले आहे. येथील प्रांतीय सरकारची चालू हंगामातील गहू खरेदी योजना पूर्णपणे कोलमडून पडली आहे. याचा थेट फटका पाकिस्तानच्या सर्वसामान्य आणि गरीब जनतेला बसत असून, बाजारात गहू आणि पिठाचे दर कल्पनेपलीकडे वाढले आहेत. सरकारी अन्न विभाग धान्य साठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे बाजारात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे लोकांना आता दुप्पट दराने पीठ खरेदी करावे लागत आहे.
06 Jun 2026 01:25 PM (IST)
होंडा एलिव्हेट जूनमध्ये ७० हजारांपर्यंतच्या सवलतींसह उपलब्ध आहे, ज्यामध्ये कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. यावर विस्तारित वॉरंटी आणि कॉर्पोरेट फायदे देखील मिळतात. SUV खरेदी करण्यासाठी काय ऑफर आहेत जाणून घ्या. तुम्ही जूनमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? ह्युंदाई तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. जूनमध्ये नवीन होंडा एलिव्हेट एसयूव्हीवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. कंपनी या महिन्यात आपल्या लोकप्रिय मिड-साईज एसयूव्हीवर एकूण ७० हजारांची बचत देत आहे. यामध्ये ४० हजारची कॅश डिस्काउंट आणि ३० हजारांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.
06 Jun 2026 01:15 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज, यशस्वी जैस्वाल, याचा खराब फॉर्म त्याला अजूनही सतावत आहे. क्रिकेट चाहत्यांना आशा होती की मुल्लानपूर येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक एकमेव कसोटी सामन्यात जैस्वाल आपला फॉर्म परत मिळवेल, पण तो पुन्हा एकदा खेळपट्टीवर झगडला आणि अगदीच स्वस्तात बाद झाला. त्याच्या फलंदाजीची कामगिरी बऱ्याच काळापासून सातत्याने खालावत आहे, ज्यामुळे भारतीय संघ आणि त्याचे चाहते या दोघांसाठीही गंभीर चिंतेचे कारण बनले आहे.
06 Jun 2026 01:05 PM (IST)
विदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न ९० टक्के विद्यार्थी पाहतात. विदेशात शिक्षण पूर्ण करुन तिथेच नोकरी करणे ही अनेकांची इच्छा असते. परंतु, प्रत्येकासाठी हे स्वप्न पूर्ण करणे शक्य नाही. अनेकवेळा विद्यार्थी परदेशातील शिक्षणासाठी बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेतात. परंतु, अनेकांच्या मनात हा प्रश्न पडतो की, शैक्षणिक कर्ज घेणे योग्य आहे का ? शिक्षणासाठी मोठ्या रकमेचे कर्ज घेणे कितपत फायदेशीर ठरते याच प्रश्नाचे उत्तर एका २२ वर्षीय तरुणीने दिले आहे. इन्टाग्रामवरील एक व्हिडिओ शेअर करत या तरुणीने आपल्या दोन वर्षांच्या प्रवासाचा अनुभव दिला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे की, अवघ्या २० व्या वर्षी परदेशातून पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी ४० लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतले होते, आता तिच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
06 Jun 2026 12:48 PM (IST)
रात्रीच्यावेळी घरात टीव्ही पाहत बसलेल्या माणसांवर घरात घूसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. बुधवारी (दि. ३) रात्री नऊच्या दरम्यान लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक कुसुमलेवाडी येथे घडली आहे. घरातील माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारील जंगलात पसार झाला. बिबट्याने केलेले हल्ल्यातील जखमी संतोष गोविंद सुर्वे (वय ५०) व हर्षद राजेंद्र सुर्वे (वय १९, दोघेही राहणार बेनी बुद्रुक कुसुमलेवाडी) यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करण्यात आले. मात्र संतोष सुर्वे यांच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
06 Jun 2026 12:36 PM (IST)
फुलेनगर भागातील किरण निकम खून प्रकरणाच्या वादातून सुरू झालेल्या टोळीयुद्धातून (गँगवार) पेठरोड आणि शेषराव महाराज चौकात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमधील दोन मुख्य संशयित आरोपींना अटक करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे. गेल्या १० महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार विकी विनोद वाघ आणि दुसरा संशयित किरण मोरे या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
06 Jun 2026 12:24 PM (IST)
आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्याच्या खुनाची धक्कादायक घटना शुक्रवारी ( दि. ५) पहाटे उघडकीस आली आहे. दरम्यान, या खुनानंतर आरोपीने सोशल मीडियावर ‘वन मॅन शो कसा ठोकला’ अशा आशयाचे स्टेटस बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घोडेगाव पोलिसांनी एका विद्यार्थ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ संतोष साखरे (वय २३) हा विद्यार्थी वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेला असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. झोपेत असतानाच त्याच्या डोक्यावर लोखंडी पाईप व सिमेंटच्या गट्ट्याने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी अमय भिका कोकरे (वय १९) याने पूर्वी झालेल्या भांडणाचा तसेच अनिरुद्ध साखरे याच्यासोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
06 Jun 2026 12:12 PM (IST)
फुगेवाडी, हडपसर तसेच काळेपडळ परिसरात विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीणमधील त्या निलंबित चार पोलिसांचे मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीला शेकडो कॉल्स झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रजापतीच्या अवैध व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते का, अथवा पोलिसांचाच छुपा पाठिंबा होता का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू पिल्याने २२ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान उरुळी कांचन येथील राधेश्याम हरीराम प्रजापती याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांशी असलेले संबंध उघडकीस आले आहेत. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील अजित काळे व सुमित वाघ तसेच यवत पोलिस ठाण्यातील रामदास जगताप व सुभाष डोईफोडे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण झाले. त्यात प्रजापतीशी वारंवार संभाषण झाल्याचे निष्पन्न झाले.
06 Jun 2026 12:00 PM (IST)
मध्य पूर्वेमध्ये (Middle East) पुन्हा एकदा युद्धाचा भीषण भडका उडाला आहे. जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांपैकी एक असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त (Strait of Hormuz) अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष आता थेट बॅलिस्टिक क्षेपणास्त्र युद्धात रूपांतरित झाला आहे. अमेरिकेने इराणचे ड्रोन पाडल्यानंतर आणि त्यांच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्यानंतर, संतप्त झालेल्या इराणने थेट कुवेत आणि बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकी सैन्याच्या तळांना लक्ष्य केले आहे. या अचानक झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात (Gulf Region) युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण आहे.
06 Jun 2026 11:42 AM (IST)
Crowds gather at Jantar Mantar for Cockroach Janta Party protest against education minister.
Education minister Dharmendra Pradhan must resign! pic.twitter.com/skLGZfzCiT
— Cockroach Janta Party (@CJP_for_India) June 6, 2026
06 Jun 2026 11:40 AM (IST)
तृणमूल काँग्रेसची महत्त्वपूर्ण सभा शुक्रवारी झाली. ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. बंडखोर आमदारांचा विरोध असूनही, ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली. ममता या तृणमूलच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम राहतील.
06 Jun 2026 11:30 AM (IST)
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटने इतिहास रचला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक पूर्ण केले आहे. तो इंग्लंडसाठी ३०० कसोटी डाव खेळणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी इंग्लंडच्या १४९ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात कोणीही ही कामगिरी केलेली नाही. एकूण यादीत, ३०० कसोटी डाव खेळणारा जो रूट हा जगातील दुसरा फलंदाज आहे. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये रूटची बॅटिंग फसली होती.
06 Jun 2026 11:20 AM (IST)
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची धग आता कल्याणपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने कल्याणमधील म्हारळ परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयच्या विशेष पथकाने संबंधित विद्यार्थिनीच्या घरी भेट देत तिचा जबाब नोंदवला. तपासात संशयितांच्या यादीत असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या कॉल डिटेल्स आणि संपकांची छाननी करताना या विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.
06 Jun 2026 11:08 AM (IST)
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लग्नाच्या अवघ्या 12 दिवसांत तलाठी तरुण गणेश कोळी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आणि मानसिक त्रासामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
06 Jun 2026 11:02 AM (IST)
प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, "कदाचित ही पहिलीच वेळ आहे जेव्हा दिल्ली पोलिसांनी योग्य निर्णय घेऊन सीजेपीला आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. आता सोशल मीडियावर मिळालेला पाठिंबा प्रत्यक्षात दिसतो की नाही, हे पाहणे बाकी आहे."
06 Jun 2026 11:00 AM (IST)
भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Conflict) यांच्यातील राजनैतिक संबंध आणि सीमावाद पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan) या प्रदेशात ७ जून रोजी ‘सार्वत्रिक निवडणुका’ घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या या कृतीवर भारत सरकारने प्रचंड संताप व्यक्त केला असून, ही निवडणूक पूर्णपणे बेकायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तात्काळ पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या या राजकीय खेळीचा तीव्र निषेध नोंदवला आणि हा संपूर्ण भूभाग भारताचाच असल्याचा पुनरुच्चार केला.
06 Jun 2026 11:00 AM (IST)
Gathering of cockroaches at Jantar Mantar.
Support peaceful. pic.twitter.com/neYMr8tR6l
— Cockroach Janta Party (@CJP_for_India) June 6, 2026
06 Jun 2026 10:50 AM (IST)
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या स्तर-१ व स्तर-२ मधील महत्त्वाचे उपांग असलेल्या आपत्कालीन झडप भुयार (ई.व्ही.टी.) आणि उल्लोळक विहिरीच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पोफळी, कॉडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे गावांच्या नळपाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, असे निर्देश कोयना सिंचन विभागाने दिले आहेत.
06 Jun 2026 10:40 AM (IST)
दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीला (सीजेपी) जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. सीजेपीने आपल्या समर्थकांना जंतर मंतरवर शांततापूर्ण निदर्शनासाठी परवानगी मागण्याकरिता शनिवारी सकाळी ९ वाजता पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर जमण्याचे आवाहन केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी या आंदोलनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता, त्यामुळे प्रस्तावित निदर्शनासाठी कोणताही कायदेशीर अडथळा उरला नव्हता.
06 Jun 2026 10:30 AM (IST)
बिहारसह संम्पूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले कोचिंग क्लासचे शिक्षक म्हणून खान सरांना ओळखले जाते.दरम्यान, त्यांच्या कोचिंग सेंटरवर झालेल्या गोळीबारमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कधीकाळी केवळ ४० रुपये कमावणारे खान सर आज कोट्यवधींचे मालक कसे बनले आणि फैजल खान यांचा ‘खान सर’ बनण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता.
06 Jun 2026 10:21 AM (IST)
06 Jun 2026 10:20 AM (IST)
‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे सध्या चर्चेत आहे. याचे कारण तिच्याभोवती निर्माण झालेला वाद आहे. काही वर्षांपूर्वी शिल्पा शिंदेने ‘भाभीजी घर पर है’ चे निर्माते संजय कोहली यांच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, अलीकडेच या अभिनेत्रीने आपला गुन्हा खोटा असल्याचे कबूल केले. तेव्हापासून शिल्पा शिंदे वादात अडकली आहे. आता, एआयसीडब्ल्यूएने (AICWA) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या खोट्या लैंगिक छळाच्या प्रकरणासंदर्भात कठोर कारवाईची मागणी केली आहे. यानंतर, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
06 Jun 2026 10:10 AM (IST)
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या परदेशात फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. पुण्यात निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यावर मोक्का कारवाई करण्यात आली. मात्र खोट्या पासपोर्टवरती निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला. त्याला शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र अजून ही निलेश घायवळचा शोध लागला नाही. आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्याचा भाऊ सचिन घायवळ याला राजस्थान मधून अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यात आल आहे. त्याला ९ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीत सचिन घायवळ याने मोठी कबुली दिली आहे.