मुंबई : मुंबई (Mumbai) येथील परळ (Parel) भागात एका पेट्रोल पंपाच्या (petrol pump) जवळ आगीची घटना घडली आहे. पेट्रोल पंप पासून काहीच फुटांच्या अंतरावर असलेल्या फुटपाथमधून आगीचे लोट येत असून महानगर गॅसची पाईप लाईन लीक झाल्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे सध्या परळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दादर फायर स्टेशनच्या दोन अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या अग्निशमक दलाचे जवान आगीवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्न करीत आहेत. सध्या परिसरातील पेट्रोलपंप सह जवळपासची दुकाने बंद करण्यात आली असून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. महानगर गॅसचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून सध्या आगीचे कारण शोधण्याचा प्रयन्त करीत आहेत. आगीच्या घटना घडल्यावर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही.