मंगळवेढा : मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन तरूणीस अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील पीडित मुलीचे वडील व आई (दि.२४) रोजी दुपारी ४ वाजता नातेवाईकांचे निधन झाल्याने केडगाव जि. सांगली येथे ते गेले होते. दरम्यान घरामध्ये फिर्यादीच्या दोन मुली व मुलगा असे घरी होते.
फिर्यादीच्या मुलीने मोबाईलवर फोन करून कळविले मी व भैय्या असे दोघेजण शाळेत गेलो होतो. आता घरी आलो आहे परंतू दुसरी बहिण घरी नसल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी सर्वत्र याचा शोध घेतला. फिर्यादी हे ही घटना समजताच तात्काळ गावी निघून आले. सर्वत्र चौकशी केली असता सदर मुलगी मिळून आली नाही. अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
तीचे वर्णन पुढील प्रमाणे- उंची १५५ सेंमी, अंगात नेसणेस पोपटी रंगाचा टॉप व चॉकलेटी रंगाची पँट, पोपटी रंगाची ओढणी, शिक्षण इयत्ता १२ वी, भाषा मराठी, अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.