Abhijit Dipke CJP Protest: दिल्लीत तरुणांचा जनसागर; संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त!
एकीकडे दिल्लीत सीजेपी’च्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय मात्र चांगलेच चिंतेत होते. त्यातच अभिजीत दिपकेंनी कॉकरोच जनता पार्टीची चळवळ सुरु केल्यापासून त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या वाळूज येथील त्यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अभिजीत दिपके हे आज सकाळी अमेरिकेतून दिल्लीमध्ये दाखल झाले. एकीकडे जंतरमंतर मैदानात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा पोलीस प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आज सकाळी 10.30 वाजता सुरू झाले तर दुपारी 3.30 वाजता आंदोलनाची सांगता करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण जंतर-मंतर परिसर रिकामा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी आंदोलनस्थळी भेट देत सुमारे 30 मिनिटे उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी भाषण करत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास पुढील आठवड्यात देशभरातील इतर शहरांमध्येही आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे.
“दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोचचे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉकरोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कॉकरोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.






