पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या नेत्या तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांना डेक्कन भागातून पकडण्यात आले. खंडणी विरोधी पथक दोनने त्यांना घटनेनंतर काही तासांत पकडण्यात यश आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे व सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिली.
जमिनीच्या वादातून त्यांची निर्घुन हत्या झाली असल्याचे समोर आले आहे. वनीस प्रल्हाद परदेशी (रा. गुरूवार पेठ, पुणे. मुळ रा. बेंदवस्ती, जेजुरी) आणि महादेव विठ्ठल गुरव उर्फ काका परदेशी (वय ६५, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे. मुळ रा. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जेजुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार शंकर संपते, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, प्रदिप गाडे आणि पवन भोसले यांच्या पथकाने केली आहे.
जेजुरीतील महेबुब सय्यदलाल पानसरे हे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय मानले जात होते. पानसरे यांचा जमीनीच्या वादातून शुक्रवारी सायंकाळी बेंदवस्ती येथे डोक्यात कुर्हाड व कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. यावेळी साजिद युनुस मुलाणी आणि राजु फिरोज पानसरे हे जखमी झाले होते. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंद केला होता.
दरम्यान, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात होता. यादरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात गुन्हे शाखेतर्फे कॉम्बिंग ऑपरेशन राबविले जात होते. यावेळी सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांना पानसरे यांच्या खूनातील वनीस आणि महादेव हे डेक्कन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, दोन वेगवेगळी पथकांनी डेक्कन परिसरात शोध मोहिम सुरू केली. काही तासांत त्यांना डेक्कन परिसरातून पकडले. त्यांना पुढील कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.