अफगाण बेदाण्यामुळे तासगावचा द्राक्ष उद्योग संकटात; दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची तयारी
तासगाव बाजार समितीच्या सभागृहात गुरुवारी द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समितीचे संचालक, व्यापारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत अफगाण बेदाणा प्रकरणावरून व्यापाऱ्यांना जाब विचारण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी केली.
बैठकीस बेदाणा असोसिएशनचे अशोक बाफना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बाजार समितीचे संचालक कुमार शेटे, महादेव पाटील, खंडू पवार, रेखा पाटील, प्रभारी सचिव चंद्रकांत कणसे यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी बेदाणा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते.
Nicolas Maduro : जर ट्रम्प करू शकतात, तर पंतप्रधान मोदी का नाही? असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?
सभापती युवराज पाटील म्हणाले, काही व्यापारी अफगाण बेदाणा आणून त्यावर तासगावचे लेबल लावून विक्री करत आहेत. हा प्रकार केवळ फसवणूक नसून संपूर्ण द्राक्ष उद्योगाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. अशा व्यापाऱ्यांवर बाजार समितीच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाईल. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तासगाव, सांगली व पंढरपूर बाजार समित्यांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन केंद्रीय कृषिमंत्री आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या माध्यमातून अफगाण बेदाण्याच्या आयातीवर निर्बंध आणण्याबाबत चर्चा केली जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
शेतकरी आर. डी. पाटील यांनी बैठकीस गैरहजर राहिलेल्या संबंधित व्यापाऱ्यांवर व सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, संपूर्ण उद्योगाचा कणा शेतकरी आहे. बटेजा आणि बाफना यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आयात केलेला बेदाणा नेमका कुठे गेला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यावेळी बेदाणा असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय बोथरा, सुदाम माळी, सतीश माळी, भूपाल पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे सुरेश करगणे, पृथ्वीराज शिंदे, जयसिंग चव्हाण, जितेंद्र पाटील, मोहन पाटील उपस्थित होते.
बैठकीत द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. पत्नी-मुलींचे दागिने विकून शेतकरी द्राक्षबागा वाचवत असताना काही व्यापारी शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट करत आहेत, असा आरोप करण्यात आला. बाहेरचा माल विकण्यासाठी तासगावची बाजार समिती नाही. हा प्रकार म्हणजे मड्यावरच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा असल्याचे सांगत संताप व्यक्त करण्यात आला. अफगाण बेदाणा काही फार्महाऊसवर लपवून ठेवण्यात आल्याची माहिती व व्हिडीओ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
तासगाव बाजार समितीने बुधवारी सभापती युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कोल्ड स्टोअरेजची तपासणी केली. या तपासणीत आढळलेल्या बाबींचा सविस्तर अहवाल डीडीआर यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
अफगाणिस्तानातून सुमारे १,७०० टन बेदाणा सांगली जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा तासगावच्या बेदाण्याची बदनामी करत असून भविष्यात संपूर्ण उद्योगाला मोठा धोका निर्माण करू शकतो. हा साठा तातडीने जप्त करून कारवाई करावी, अन्यथा आरपारची लढाई केली जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.






