संग्रहित फोटो
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे. सध्या समोर येत असलेल्या कलांनुसार, भाजप आणि महायुती ही आघाडीवर आहे. मीडिया रिपोर्टनुसार महायुती ही तब्बल 217 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान महायुतीची राज्यात यशाकडे वाटचाल सुरु आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर अजित पवार यांनी एक्स या समाजमाध्यांवर एक ट्विट केलं आहे. त्यांनी हे ट्विट करताना एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अजित पवार यांच्या हातात गुलाबी रंगाचे पुष्पगुच्छ आहे. या फोटोसोबत त्यांनी तीन ओळींचे खास कॅप्शन दिले आहे. महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान, अजित पवार यांनी प्रचारासाठी खास रणनीती आखली होती. संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तसेच त्यांच्या प्रचारयात्रेत गुलाबी रंगाच्या गाड्या, गुलाबी रंगाच्या पोस्टर्सचा वापर करण्यात आला होता. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांनी प्रचारमोहिमेसाठी गुलाबी रंगाचा वापर केला होता. त्यामुळेच आता अजित पवार यांनी महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असं ट्विट केलं आहे.
हे सुद्धा वाचा : मोठ्या यशानंतर CM शिंदेंची हात जोडत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अडीच वर्ष…
नागपूरमध्ये विजयी गुलाल फडणवीसांचा
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस हे आता दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना 35,755 मत पडली आहेत. तर त्यांच्यासमोर असणाऱ्या कॉंग्रेस उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना 23, 426 मतं पडली आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा तब्बल 12 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे.