m
विठ्ठल मोघे, राजेगाव : शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करता यावे म्हणून म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना अमलात आणण्यात आली. या माध्यमातून सध्या वीजेची गैरसोय असलेल्या भागात शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अल्पदरात बसवून देण्यात येत आहेत. मात्र, सौर कृषी पंप बसवण्याची जबाबदारी घेतलेल्या संबंधित कंपन्यांच्या ठेकेदारांकडून स्थानिक लाभार्थी शेतकऱ्यांची विविध कारणास्तव पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे या योजनेला भ्रष्टाचाराचे गालबोट लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, तसेच अशा प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक समित्यांची स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कुसुम सौर कृषी पंप योजने अंतर्गत सौर कृषी पंप बसवण्याचे काम काही खाजगी कंपन्या घेत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्यासाठी लागणारे खडी, वाळू, सिमेंट आदी साहित्य संबंधित कंपनीनेच पुरविणे गरजेचे असतानाही ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहेत. पंपाच्या जोडणीला लागणारे फिटिंगचे सामान शेतकऱ्यांनाच खरेदी करायला सांगत आहेत. मात्र, या ठेकेदार कंपन्या शेतकऱ्यांना पुरेश्या सुविधा देत नाहीत. लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर साठ दिवसांच्या आतमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर पंप बसवणे बंधनकारक आहे. मात्र तरीही अनेक अनेक शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून सौर कृषी पंप बसवले गेलेले नाहीत.
-ठेकेदारांकडून अटी शर्तीचे उल्लंघन
या ठेकेदारांकडून शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अटी शर्तीचे पालन केले जातं नाही. हलगर्जीपणाने कसे बसे सोलर पंप जोडले जात आहेत. त्याची फिटिंग ही व्यवस्थित केली जातं नाही. तशाच पद्धतीने शेतकऱ्यांना पंप सुरु करून दिले जातं आहेत. आम्ही सांगेल तिथे सही करा ; अन्यथा तुमचा पंप रद्द होईल, अशाही धमक्या काही ठेकेदारानी शेतकऱ्यांना केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच या सर्व पिळवणुकीविरोधात ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
[blockquote content=”केंद्र शासनाकडून कृषी सोलर योजना राबवली जात असून त्यासाठी लागणारे फिटिंग साहित्य शेतकरी बांधवांना मोफत दिले असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व असा प्रकार घडतं असल्यास महाऊर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सपंर्क साधावा. ” pic=”” name=”- महेश लोंढे, पोलीस पाटील, राजेगाव.”]
शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करता यावे म्हणून केंद्र सरकारने पीएम कुसुम सौर पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप बसवले जात आहेत. मात्र, पंप बसवणाऱ्या कंपनीच्या ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. अशा ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.
– राहुल पवार, व्यावसायिक व शेतकरी.
सोलर पंप जोडणी साहित्य निकृष्ट दर्जाचे असून फिटिंग साहित्य ही हलक्या स्वरूपाचे आहे. पंप बसवणाऱ्या कामगारांना पुरेसा अनुभव नसल्याने पंपाची फिटिंग व्यवस्थित केली जात नाही.
– अक्षय नांगरे, स्थानिक शेतकरी.
केंद्र शासनाच्या अनेक योजना चांगल्या आहेत. प्रत्येक गाव पातळीवर अशा योजनेच्या देखरेखीसाठी स्थानिक समिती तयार करून तिचे नियंत्रण या कामगारावर राहिले तर अशा प्रकाराला लवकर आळा बसेल.
– अरुण भोई, जिल्हा अध्यक्ष, ओबीसी फाउंडेशन.