अजित पवार मुख्यमंत्री होणार? पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यनंतर अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
पृथ्वीराज चव्हाण यांनी ते वक्तव्य सहजपणे केलेलं नव्हतं. ते वक्तव्य अत्यंत गांभीर्याने घेण्यची गरज आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या दुसऱ्या वर्षपुर्तीनिमित्त महाराष्ट्रातही काहीतरी वेगळे होऊ शकते का, असं विचारलं पाहिजे, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात लवकरच अजितपर्व येईल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून महायुती सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्रीपदावर काम करत आहेत. लाडकी बहीण ही संकल्पना अजित पवार यांचीच होती. या योजनेची अंमलबजावणीही त्यांनीच केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणींचा भक्कम पाठिंबा मिळाला, असंही मिटकरींनी स्पष्ट केलं.
अजित पवार काम करणारे नेतृत्तव आहे. त्यांचे कधीही रुसवेफुगवे नसतात, ते कधीही सरकारवर कधीही नाराजी व्यक्त करत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर विरोधक त्यांच्यावर आरोप करतात, बाहेरच्या, जवळच्या सगळ्याचं शांततेत ऐकून घेतात, अजिबात विचलित न होता, अजित पवार काम करत असतात, शांततेत जनतेत सातत्याने काम करत राहतात, जनतेची सेवा करतात, महायुतीचे संबंध घट्ट करत आहेत. तुम्ही अजित दादांकडे बारकाईने पाहिल तर ते कधीही त्यांचा राग , संताप व्यक्त करत नाहीत, ते कधीही रुसून बारामतीला गेले नाहीत, आक्रमक झाले नाहीत. दादांनी कधीही कसालाही अट्टहास केला नाही, अशा शब्दांत मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला.
आमच्या पक्षातून काही लोक तिकडे गेले असतानाही त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, प्रत्येकाला आपापाला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. दादांनी महायुतीत रुसण्याचा फुगण्याचा कार्यक्रम केला नाही. राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्त्व स्वीकारले आहे. अजित पवार राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत. हेही आम्ही मान्य केलं आहे. तर एकनाथ शिंदे हे पहिले उपमुख्यमंत्री आहेत. हेही आम्हाला मान्य आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या विठ्ठलाच्या पुजेचा मानी आम्ही एकनाथ शिंदेंना दिला. असही मिटकरींनी सांगितले.त्यासोबतच पार्थ पवारांच्या प्रकरणात अजित पवार यांचा फोन नॉट रिचेबल नव्हता, त्यांनी संयमाने सर्व प्रकरण हाताळले. ते बारामतीला गेले नाहीत. महायुती सरकारच्या काळात आम्ही एकत्रित राहून काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या चौखूर धावणाऱ्या रथाला आम्ही पाठिंबा दिला आहे, असेही अमोल मिटकरी यांनी सांगितले.
अमेरिकेतील एपस्टाईन फाईल्स प्रकरणावरून गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वादंग सुरू आहे. या प्रकरणातील माहिती सार्वजनिक झाल्यास त्याचा परिणाम भारताच्या राजकारणावरही होऊ शकतो, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो,” हे वक्तव्य एपस्टाईन प्रकरणाच्या संभाव्य परिणामांशी जोडले गेले.
जेफ्री एपस्टाईन हा अमेरिकेतील मोठा उद्योगपती होता. त्याने अनेक बेकायदेशीर कारवाया केल्या आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्या घडामोडींमध्ये गुंतवले. “अमेरिकेतील सर्व मोठ्या नेत्यांची नावे या प्रकरणात आली आहेत, त्यात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव आहे. त्यामुळे ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागू शकतो,” असे त्यांनी म्हटले. तसेच, ‘अमेरिकेच्या निवडणूक प्रणालीत फार कडक निकष आहेत आणि त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. “अमेरिकन संसद ट्रम्प यांच्या मागे लागली आहे. संसदेकडे १० हजार कागदपत्रे आहेत, जी कधीही सार्वजनिक होऊ शकतात. नावं उघड करण्याचा दबाव आहे, पण ट्रम्प ती सार्वजनिक करण्यास तयार नाहीत,” असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिल्याचा उल्लेखही चव्हाण यांनी केला.






