सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट येथे बंद दाराआड चर्चा केल्याने जयंत पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नाराज असलेले पाटील हे अजित पवारांसाेबत जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटलांसोबत झालेल्या भेटीनंतर अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
माध्यमांनी काय बातमच्या चालवायच्या हा त्यांचा अधिकार आहे, पण आम्ही संस्थेच्या बैठकीसाठी एकत्र आलाे हाेताे असे अजित पवारांनी स्पष्ट केले. तर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बाेलणे टाळले. वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या नियामक मंडळाची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीला नेते शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार हाेते. शरद पवार यांचे संस्थेत आगमन हाेण्यापुर्वी जयंत पाटील हे तेथे हजर झाले. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात ते गेले. आत असलेल्या सर्व व्यक्तींना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या दाेन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा रंगली.
राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. यापुर्वी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली हाेती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बंद दाराआड त्यांनी चर्चा केल्याने ते अजित पवार यांच्यासाेबत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान, या दाेन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असताना, शरद पवार यांचे तेथे आगमन झाले. बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासाेबत निघून गेलेे. या दाेन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलणे टाळले.
उपमुख्यमंत्री पवार पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आम्ही संस्थेच्या बैठकीसाठी आलाे हाेताे. तुम्हाला काय बातम्या चालवायच्या हा तुमचा प्रश्न आहे. सध्या ऊस उत्पादनात एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, ताे वाढविण्यासंदर्भात आम्हाला काही निर्णय घ्यायचे हाेते. इतर फळबांगांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे नमूद करीत पवार यांनी बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत खुलासा केला.