छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय महानाट्य रंगले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून प्रचाराचा धुरळा उडाला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर निधी देण्याच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरुन अंबादास दानवे यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “फडणवीस रोज खोटं बोलतात. फडणवीस शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्याचे काम करत आहे. उमेदवार अजित पवार हे ठरवत नसून भाजप ठरवत आहे. मोदींना हिंदुस्तान आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील भाजपाकडे गेलेली गद्दार लोक यांच्या पक्षाची आज स्थिती काय आहे” असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीला दररोज मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात आणावे लागते
त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी महायुतीवर देखील निशाणा साधला आहे. अंबादास दानवे म्हणाले, “महायुतीला उमेदवार सुद्धा सापडेना. महाराष्ट्रात सात जागा अशा आहेत की महायुती मध्ये कोण लढणार असा प्रश्न आहे. छगन भुजबळ यांची कालची प्रतिक्रिया तुम्हीच बघा. छगन भुजबळ बोलले आहेत की, किमान 20 पर्यंत उमेदवार जाहीर करा. महायुतीला दररोज नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रात आणावे लागते. दररोज खोटं बोलणं चालू आहे. मला वाटत यातचं आमचं महाविकास आघाडीचं यश सामावलेलं आहे. आमचे सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. महाविकास आघाडी जागा जिंकण्यात सुद्धा पुढे राहणार आहे” असा विश्वास ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
बटन दाबा आणि निधी घ्या, हे प्रलोभन नाहीये ?
अजित पवार यांनी प्रचारसभेमध्ये ‘पाहिजे तेवढा निधी आम्ही देतो, मशीनमध्ये कचाकचा बटन दाबा, तर मला निधी द्यायला बरं वाटेल नाहीतर माझा हात आखडता होईल’ असे वक्तव्य भरसभेमध्ये केले होते. यावरुन महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. यावरुन देखील अंबादास दानवे यांनी अजित पवार यांना घेरले आहे. अंबादास दानवे म्हणाले, “कालचं अजित पवार यांचं वक्तव्य ऐकलं तर निवडणुक आयोग झोपलेलं आहे का असा मला प्रश्न पडलेला आहे की बटन दाबा आणि निधी घ्या, हे प्रलोभन नाहीये ? ही गोष्ट विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली असती तर निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल केला असता. रणदीप सिंह सुरजेवाला काहीच बोलले नाहीत तरी त्यांच्या वरती गुन्हा दाखला झाला. याचं घटना बदलण्याचं षडयंत्र आहे, किरकोळ बदल करावे लागतात असं लंगड समर्थन केलं जात आहे. ही सत्यता अजित पवार यांच्या तोंडून बाहेर आलेली आहे,” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.