मुंबई : घर घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळ परिक्षेत्रातील 5309 घरांची सोडत लवकरच होणार आहे. त्यासाठीची जाहिरात शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. तसेच याच दिवसापासून ऑनलाईन अर्जविक्री स्वीकृतीसही सुरुवात होणार आहे. ही सोडत नोव्हेंबरमध्ये काढण्यात येण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, 5309 घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. तर या घरांसाठी शुक्रवारी (दि.15) सप्टेंबरला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवारपासूनच अर्जविक्री-स्वीकृती सुरू होणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही उत्पन्न गटांतील घरांचा समावेश आहे. याशिवाय, 20 टक्के सर्वसमावेशक योजना, प्रथम प्राधान्य, म्हाडा गृहनिर्माण आणि प्रधानमंत्री आवास योजना अशा योजनेतील ही घरे आहेत.
दरम्यान, जुलै-ऑगस्टमध्ये ही सोडत काढण्यात येणार होती. मात्र, काही कारणाने ही सोडत लांबणीवर पडली. आता मात्र ही सोडत मार्गी लागणार आहे. त्यानुसार, उद्यापासून अर्जविक्री केली जाणार आहे. यापूर्वी कोकण मंडळाने मे 2023 मध्ये 4654 घरांसाठी सोडत काढली. मात्र, सोडतीतील अनेक घरे विकली नाहीत. तसेच प्रथम प्राधान्य आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला.