1.50 कोटींची BMW, मैत्रिणीला दिला 4 BHKफ्लॅट; २१ कोटींना गंडा घालणाऱ्या हर्षच्या दिल्लीत आवळल्या मुसक्या
छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलात तब्बल २१ कोटींचा घोटाळा झाला होता. कंत्राटी क्लर्क असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरने पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून हा घोटाळा केला होता. दरम्यान प्रकरण उघडकीस आल्यानंतर फरार झालेल्या हर्षकुमारच्या आज पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पळून जाण्याच्या तयारीत असताना दिल्लीतून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलमध्ये कंत्राटी क्लर्क असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरने मोठा घोटाळा केला होता. 59 कोटींपैकी तब्बल 21 कोटी हर्षने गायब केले होते. प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण डिसेंबर 2024 मध्ये उघडकीस आलं. या प्रकरणी त्याच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासून हर्ष फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान तो दिल्ली असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्याच्या मागावर असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली गाठली. दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना हर्षकुमारला पोलिसांनी अटक केली. एवढंच नाहीतर हर्षच्या आई वडिलांना सुद्धा कर्नाटकच्या मुरुडेश्वरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.
हर्षकुमार अनिल क्षीरसागर या मुख्य आरोपीला आणि त्याच्या साथीदाराला फक्त 13 हजार रुपये पगार होता. दोघंरही कंत्राटी कर्मचारी. मात्र इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला होता. या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाईक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला होता. शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती. तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पतीने 35 लाखांची एसयुव्ही कार खरेदी केली होती.
क्रीडा संकुलासाठी शासनाकडून मिळणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेत खातं उघडण्यात आलं होतं. या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे होतो. मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा बीके जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि बँकेला दिली. स्वतःचा नंबर इंटरनेट बँकिंगसाठी ऍक्टिव्हेट करून त्यावरून ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली. विशेष म्हणजे, विभागीय उपसंचालकाच्या हा प्रकार 6 महिन्यानंतर लक्षात आला.
हर्ष कुमारने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांचं नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेला बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर करून घेतलं. आतापर्यंत क्षीरसागर, शेट्टी यांच्या खात्यात 59 कोटी आले. बुकमध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते. 2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास 21 कोटी सात लाख 82 हजार रुपयांचा निधी आला होता. त्यामधून कोट्यावधी रुपये त्यांनी वळवले. अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.