मोखाडा तालुक्यात प्राथमिक शिक्षण व्यवस्थेची परवड, जिल्हापरिषद शाळांमध्ये अनेक महत्वाची पदे रिक्त
दीपक गायकवाड /मोखाडा: मोखाडा तालूक्यातील 154 जिल्हापरिषद शाळेमधून मुख्याध्यापकांच्या 6 रिक्त पदांसह 15 शिक्षक कमी आहेत. त्यातच 13 केंद्रप्रमुखांपैकी 11 केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. त्यामूळे या 11 केंद्रांचा कार्यभार पदवीधर शिक्षकांना सोपवला आहे. आधीच रिक्त असलेल्या 68 पदवीधर शिक्षकांच्या रिक्त पदात त्यामुळे वाढ झाली असल्याने शिक्षण व्यवस्थेवर आणखी ताण वाढलेला आहे.त्यामूळे मोखाडा तालूक्याची शिक्षण व्यवस्थेची परवड झाली आहे. अशा परिस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड होत असल्याने तातडीने अतिरिक्त शिक्षकांची तजविज करण्याची मागणी तालूक्यातील पालकांकडून केली जात आहे.
मोखाडा तालूक्यात 13 केंद्र शाळा असून 36 शाळा 8 वी पर्यंत, तर 115 शाळा ह्या इयत्ता 5 वी पर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा आहेत. मात्र अपुऱ्या शिक्षकांमूळे स्थानिक प्रशासनाला अनेकदा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात सद्यस्थितीत 19 मंजूर मुख्याध्यापकांपैकी 13 मुख्याध्यापक कार्यरत असून 6 पदे रिक्त आहेत . पदवीधर 103 शिक्षकांपैकी 25 मुळ व 10 असे एकूण 35 शिक्षक कार्यरत असून 68 पदे रिक्त आहेत व सहाय्यक शिक्षकांची 337 पदे मंजूर असून त्यात मुळ 307 व पेसा अंतर्गत 15 असे एकूण 322 शिक्षक कार्यरत आहेत, ज्यात 15 उपशिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यातच शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या मंजूर 5 पदापैकी 1 कार्यरत असून तब्बल 4 शिक्षण विस्तार अधिकारी पदे रिक्त आहेत.
शिक्षण विस्तार अधिकारी यांचे सह थेट सहशिक्षक असे एकूण 104 अधिकारी व शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालूक्यातील प्राथमिक शिक्षणव्यवस्था सांभाळायची कशी ? हा महत्वाचा प्रश्न स्थानिक प्रशासनाला भेडसावत आहे.
दरम्यान इतका मोठा रिक्त पदांचा आकडा असताना त्यात वारंवार होणा-या लक्षणीय फुगवट्याची जाणीव असतांनाही वरिष्ठ पातळीवरून जुजबी उपाययोजने व्यतिरिक्त कार्यवाही होत नसल्याने शिक्षण विभागाला सध्या तरी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पर्यायाने अनेक ठिकाणी शाळांना टाळे ठोकणे , उपोषणासारखे प्रकार निस्तरावे लागत आहेत.
कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय साखरी या मुलींच्या शाळेत तब्बल 12 वर्षांपासून इंग्रजी विषयाला शिक्षकच नाही. पाठ्यक्रम शिकवून इतर विषयांच्या शिक्षकांना इंग्रजी विषय शिकवावा लागत आहे.आधिच अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना इंग्रजी विषयाचा अतिरिक्त भार सोसावा लागत असल्याने शिक्षकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर मुळ विषयांचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दुरगामी परिणाम होत आहे.
वसंत महाले जे गटशिक्षणाधिकारी (प्रभारी) आहेत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणतात की तालुक्यातील रिक्त पदांसाठी सेवानिवृत्त व कंत्राटी पध्दतीने पदभरती साठी अर्ज मागवले होते. परंतु, रिक्त पद भरतीची कार्यवाही जिल्हास्तरावर होत असते.