उरुळी कांचन: उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून शनिवारी (ता. १५) अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गाव बंद ठेवण्याचा निर्णय येथील युवकांनी घेतला होता. त्याला गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला असून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर दोन सख्या भावांनी मागील पंधरा दिवसांपासून शस्त्राचा धाक दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे संपूर्ण गाव हादरले असून, या घटनेचा निषेध म्हणून गावातील तरुणांनी एकत्र येऊन गुरुवारी (ता. १४) हजारो नागरिकांच्या सहभागातून गावात मूक मोर्चा काढला होता. आरोपींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात पोलिस दूरक्षेत्र उरुळी कांचन येथे येऊन आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना निवेदन देण्यात आले. संबंधीत पीडित युवतीला न्याय मिळावा, मुख्य आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.
बलात्काराच्या आरोपात अटक केलेला दोघा आरोपींना पोक्सो अंतर्गत कारवाई करुन आरोपींना कडक शिक्षेपर्यंत कारवाईची प्रक्रिया जलद गतीने करावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. या घटनेचा निषेध म्हणून उरुळी कांचन शहरातील सर्व व्यवहार अत्यावश्यक सेवा सोडून शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे निवेदन देऊन शनिवारी एक दिवस गाव बंदची हाक देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निवेदन पुणे शहर अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र.५ विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांना देण्यात आले.
शाळा, महाविद्यालये सुरु राहणार..
उरुळी कांचन गाव बंद असले तरी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय व डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालय सुरूच राहणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय सेवा, सार्वजनिक परिवहन सेवा या सुरळीत सुरू राहणार आहेत.
[blockquote content=”उरुळी कांचन गावात घडलेली ही घटना दुर्दैवी आहे. या निंदनीय घटनेमुळे अत्यावश्यक सेवा सोडून गाव बंद राहणार आहे. याबाबतचे निवेदन गावच्या वतीने पुणे शहर पोलिसांना देण्यात आले आहे. या बंदला संपूर्ण गावाने पाठींबा दिला आहे.” pic=”” name=” भाऊसाहेब ल.कांचन, सरपंच, उरुळी कांचन”].