पुण्यात हवामानाचा खेळ सुरू (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुण्यात चाळीशीचा तडाखा, गारांचा शिडकावा
पुणेकरांनी अनुभवला हवामानाचा विरोधाभास
ढगाळ वातावरण राहिल्याने हवेत दमटपणा वाढला
पुणे: एकीकडे तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचून असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना, दुसरीकडे शहराच्या काही भागांत हलक्या पावसासह गारांचा वर्षाव झाला. एप्रिलच्या अखेरीस उष्णतेचा तडाखा आणि अचानक पडलेला गारांचा पाऊस असा विरोधाभासी अनुभव बुधवारी पुणेकरांनी घेतला.
शहरात तापमानाने चाळीशी पार केल्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. उन्हाच्या तीव्र झळांबरोबरच दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने हवेत दमटपणा वाढला आणि उष्णतेचा त्रास अधिक जाणवला. सकाळपासूनच कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून आली, तर दुपारच्या वेळी अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले.
बुधवारी (ता. २२) पुण्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दुपारनंतर वातावरण काहीसे ढगाळ झाले आणि सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र या पावसामुळे उकाड्यापासून फारसा दिलासा मिळाला नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, पिंपरी, नाशिक फाटा, आकुर्डी, तळेगाव, चिंचवडसह शहरातील काही भागांत हलका पाऊस पडला. तर वारजे, नांदेड सिटी आणि सिंहगड रोड परिसरात गारांचा वर्षाव झाल्याने नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. २३) कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस स्थिर राहण्याची, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, मात्र दुपारी किंवा संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि उष्णतेची लाट कायम राहण्याची चिन्हे आहेत.






