पिंपरी : चिंचवडमध्ये (Chinchwad Bypoll) भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नाना काटे (Nana Kate) यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र, या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना संपत्तीविषयी माहिती दिली. यामध्ये अश्विनी जगताप यांची संपत्ती 26 कोटींची असल्याचे समोर आले आहे.
अश्विनी जगताप उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेत स्थावर आणि जंगम मालमत्ता ११ कोटी ४ लाख ४७ हजार ९७८ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ९४ हजार ८०७ रुपये इतकी तसेच २ कोटी २२ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सोने असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पती लक्ष्मण जगताप यांच्या नावाने स्थावर आणि जंगम मालमत्ता ५ कोटी ४६ लाख ४३ हजार १६ रुपये इतकी आहे. तर १२ लाख ५३ हजार ८४० रुपये किंमतीचे सोने आहे. दोघांची मिळून एकूण संपत्ती तब्ब्ल २६ कोटी रुपये इतकी आहे.
14 एकर शेतजमीन
स्वतः शेती तसेच बांधकाम व्यवसाय करत आहेत. त्या तीन कंपन्यामध्ये व्यवसायिक भागीदार देखील आहेत. त्यांच्या नावे विशेष करून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील केसे तर पतीच्या नावे खेड तालुक्यातील मरकळ, कोयाळी येथे दोघांच्या नावाने जवळपास १४ एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
नाना काटेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवड येथे उमेदवार जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज काटे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील उपस्थित होते.