लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश (File Photo : BJP)
पुणे : भाजपचा शहरातील चेहरा काेण ? यासाठी आता पक्षातंर्गत चढाओढ सुरु झाल्याचे दिसत आहे. त्याचवेळी पक्षाकडून महापालिका निवडणुकीची जाेरदार तयारी सुरु झाली आहे. यामुळे आगामी महापािलका निवडणुक शहर भाजप काेणाच्या नेतृत्वाखाली लढणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. खासदार गिरीष बापट यांच्यासारखी पक्षावरील पकड त्यांच्यानंतर काेणालाच घेता आली नाही. यामुळे पुढील काळात पक्षाचे कार्यकर्ते काेणाला पसंती देणार हे नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरून निश्चित हाेईल.
शहर भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत दिवगंत खासदार गिरीष बापट यांची चांगली पकड हाेती. तसेच माजी खासदार अनिल शिराेळे, माजी खासदार प्रदीप रावत यांनी शहर भाजपचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळले हाेते. परंतु बापट यांचा नेहमीच शहर भाजपमध्ये वरचष्मा राहीला हाेता. बापट यांच्या नंतर शहर भाजपमध्ये सर्वसमावेशक असे नेतृत्व काेणाचे हा चर्चेचा विषय झाला आहे.
माजी महापाैर आणइ विद्यमान खासदार मुरलीधर माेहाेळ यांना पक्षाने केंद्रीय मंत्री मंडळात स्थान दिले आहे. यामुळे स्वाभाविकपणे पदाच्या दृष्टीने माेहाेळ तुर्तास तरी सरस आहेत. काेथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील हे राज्याच्या मंत्री मंडळात आहेत, तर आमदार माधुरी मिसाळ या राज्याच्या मंत्री मंडळात राज्यमंत्री पदावर आहेत. भाजपचे हे तीनही नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सक्रीय झाल्याचे दिसत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री माेहाेळ यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यात महत्वाची भुमिका बजावली. ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच पुण्याच्या विविध प्रश्न, प्रलंबित कामे, प्रकल्प आदी विषयांवर माेहाेळ यांनी गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासनाबराेबर चर्चा केली. तत्पुर्वी चंद्रकांत पाटील यांनी देखील महापालिका प्रशासनाबराेबरच चर्चा केली हाेती. तर नुकतेच मिसाळ यांनीही महापालिका प्रशासनाबराेबर विविध प्रश्नांवर चर्चा केली. या तीन बैठकांत वेगळे विषय चर्चिले गेले नाहीत. त्याचप्रमाणे शहरात भाजपच्या नेतृत्वाचा चेहरा काेणाचा हा देखील विषय आता पुढे येऊ लागला आहे. बापट यांच्यानंतर भाजपमध्ये सर्वसमावेशक असे नेतृत्व पाहण्यास मिळत नाही. केंद्रीय राज्यमंत्री माेहाेळ यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संच माेठा आहे. तसेच मुळचे पुण्याचे नसलेले पाटील यांनी देखील शहरात जम बसविला आहे.
स्थानिक नेतृत्वांकडून पालिका प्रशासनाबराेबर बैठक
मागील महापालिका निवडणुकीत राज्यसभेचे माजी सदस्य संजय काकडे यांनी महत्वाची भुमिका बजाविली हाेती. भाजपची महापालिकेत एक हाती सत्ता आली, त्यामध्ये काकडे यांच्या समर्थकांची संख्या लक्षणीय हाेती. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या काेणत्या स्थानिक नेत्याकडे पक्षनेतृत्व धुरा देणार हा आता उत्सुकतेचा विषय ठरला आहे. यासाठीच भाजपच्या स्थानिक नेतृत्वांकडून सातत्याने महापालिका प्रशासनाबराेबर बैठकी सुरु झाल्या आहे. यातून पक्षातंर्गत चढाओढ निर्माण झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.