संग्रहित फोटो
पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सुद्धा याबाबतचे संकेत दिले आहेत. आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक नेते घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकार्यांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जावे असा एक मतप्रवाह आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस १०० टक्के एकत्र निवडणुक लढवतील, असा आपल्याला विश्वास आहे. आम्ही निवडणुकीला एकत्र सामोरे जावू. – दत्तात्रय धनकवडे, माजी महापौर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये राष्ट्रवादी बरोबर युती करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. एका गटाच्या म्हणण्यानुसार महविकास आघाडीबरोबर गेल्यास पक्षाचा अधिक फायदा होईल. तर एक गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर जाण्यास इच्छुक आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय करण्यासाठी सुप्रिया सुळे आज पदाधिकार्यांबरोबर सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक घेणार आहेत.
16 जानेवारीला महापालिका निवडणुकीचा निकाल
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूका जाहीर केल्या आहेत. राज्यातील 29 महानगर पालिकांमध्ये मतदान 15 जानेवारीला पार पडेल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी युतीची गणिते, समीकरणे बदलली आहेत. ठाकरे बंधू देखील मागे हेवेदावे विसरुन मुंबईमध्ये युती करत आहेत. याचबरोबर मुंबईमध्ये महायुतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करण्याची चर्चा शहर पातळीवर सध्या सुरु नाही. आपण या चर्चामध्ये नाही. त्यामुळे आघाडीबाबतच्या निर्णयाबाबर वरीष्ठ निर्णय घेतील. – प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष, शहराध्यक्ष)






