मुंबई : महापुरूषांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तर आता मुंबईतही गुरुवारी ‘वरळी बंद’ची हाक देण्यात आली आहे. विविध संघटना आणि छोट्या पक्षांनी मिळून ही बंदची हाक दिली असून सकाळपासूनच वरळीत कडकडीत बंदला सुरुवात झाली आहे.
दरम्यान वरळीतील दुकाने बंद असून रस्तेही ओस पडले आहेत. त्याशिवाय कोणतीही अनुचित घटना घडू नये वा बंदला हिंसक वळण लागू नये म्हणून वरळीत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुण्यानंतर वरळीत बंद पुकारला जात आहे. मुंबईतील हा पहिलाच बंद आहे. शिवाय माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदारसंघ असल्याने या बंदला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र, पहाटे 6 वाजल्यापासूनच वरळीत बंद पुकारण्यात आला आहे. सकाळ पासूनच वरळीतील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. तसेच रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू असल्याने रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.
बंदच्या पार्श्वभूमीवर वरळीत जागोजागी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा बंद पुकारला जाणार आहे.
सध्या वरळीत शांततेत बंद सुरू आहे. या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. दुपारनंतर बंद अधिकच कडकडीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.