Chandrapur News: 'बांबू सिटी'कडे चंद्रपूरची वाटचाल? प्रदूषणावर हरित उपायाची चर्चा, पर्यावरणासह रोजगारालाही चालना
कोयनेचे पाणी मुंबईकडे? वाशिष्टी नदी वाळणार, कोकण पेटणार; दाभोळ खाडीतील ८४ गावांचा रोजगार धोक्यात?
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, कृषी क्षेत्र, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था (बीआरटीसी) तसेच औद्योगिक परिसर यामुळे हरित विकासासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने बांबू लागवड, प्रक्रिया उद्योग आणि संशोधनाला चालना दिल्यास प्रदूषण नियंत्रणासह रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. बंगळुरूच्या जक्कूरमध्ये प्रत्येक नागरिकाच्या नावाने बांबू लागवड, रिकाम्या जागा, नाले, जलस्रोत परिसर आणि उद्यानांमध्ये बांबू विकसित करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून कार्बन शोषण, तापमान नियंत्रण, जैवविविधता संवर्धन आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. चंद्रपूरमध्येही अशाच प्रकारचे मॉडेल राबविण्याची क्षमता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात बांबूची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असली तरी त्यावर आधारित उद्योग आणि बाजारपेठ अपेक्षित प्रमाणात विकसित झालेली नाही. बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था अस्तित्वात असूनही संशोधन, नवीन प्रजातींचा विकास आणि उद्योगाभिमुख उपक्रमांना अपेक्षित गती मिळालेली नसल्याची चर्चा आहे. प्रशिक्षण घेतलेल्या हजारो तरुणांपैकी अत्यल्प जणांनीच उद्योग उभारल्याचेही समोर येते. महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि मोठ्या उद्योगांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून सरकारी कार्यालये, औद्योगिक परिसर, शाळा-महाविद्यालये, उद्याने, रस्त्यांच्या कडेला तसेच जलस्रोतांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केल्यास शहराच्या हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ होऊ शकते.
जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सीएसआर निधीचा नियोजनबद्ध वापर झाल्यास ‘बांबू सिटी चंद्रपूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ताडोबा पर्यटनाशी जोडून बांबू पर्यटन, बांबू उत्पादने आणि अनुभव केंद्रे विकसित करण्याचीही मोठी संधी चंद्रपूरला आहे. योग्य नियोजन आणि ठोस अंमलबजावणी झाल्यास प्रदूषणग्रस्त चंद्रपूरची ओळख भविष्यात ‘बांबू शहर’ म्हणून निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपूरला हरित आणि शाश्वत विकासाचा नवा मार्ग देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बांबू डिझायनर मीनाक्षी वाळके यांनी ‘बांबू सिटी चंद्रपूर’ ही संकल्पना पुढे आणली आहे. त्यांनी औष्णिक वीज प्रकल्प, पश्चिम कोळसा क्षेत्र, महानगरपालिका तसेच अन्य शासकीय व औद्योगिक संस्थांनी त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून बांबू आधारित हरित विकासाला चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘बांबू सिटी चंद्रपूर’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा यांनी केली. या समितीत प्रशासन, उद्योग क्षेत्र, बांबू संशोधन संस्था आणि तज्ज्ञांचा समावेश करून समन्वयाच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
चंद्रपूरमध्ये बांबू आधारित हरित विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी देशातील बांबू क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहकार्याची तयारी दर्शविली आहे. मुंबईतील बांबू आधारित उद्योगसमूहाचे संस्थापक मिलिंद सप्रे यांनी आपल्या उद्योगाचा अनुभव आणि तांत्रिक मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारी व्यक्त केली आहे.






