Chandrapur News: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष, मतदारांच्या भेटीगाठी सुरू
अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सोबतच पंचायत समितीवर देखील प्रशासकराज आहे. यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. असे असताना काही दिवसापूर्वीच आरक्षण पडले. आता निवडणूक प्रक्रिया लागणार. यामुळे राजकीय पक्षासह अपक्षांनी देखील निवडणुकांसाठी कंबर कसली. जवळपास साऱ्याच पक्षाचे उमेदवार निश्चित होत आले. सत्ताधारी भाजपने देखील आपापले शिलेदार सज्ज केले, तर विरोधी पक्षाने देखील मित्र पक्षांसह ‘एकोपा’ साधत आपली ‘वज्रमूठ’ बांधली. ३ जिल्हा परिषद गट आणि ६ पंचायत समिती गण असलेल्या गोडपिपरी तालुक्यात काँग्रेस आणि भाजपची थेट लढत बघायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – गुगल)
गोंडपिपरी तालुक्यात सध्यास्थितीत तीनही जिल्हा परिषद गटात महिलाचे आरक्षण आहे. यामुळे पुरुषी उमेदवारांची चांगलीच गोची झाली. मात्र निवडणूक प्रक्रिया थांबल्याने तालुक्यातील पुरुषी राजकीय उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. नुकत्याच राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, येत्या काळात जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या निवडणुका लागणार असे बोलले जाते. प्रशासनदेखील तयार असल्याचे सांगितले जाते. मतदार याद्या देखील तयार असल्याचे अधिकारी सांगतात.
सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेसने इतर मित्र पक्षांना सोबत घेत ‘एकोपा’ साधला. ‘हम साथ साथ है’ असे म्हणत मित्र पक्षांशी एकजूट साधली. अशातच ५० टक्के आरक्षण मर्यादा पार केल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका थांबविण्यात आल्या. यामुळे संभाव्य उमेदवारांनी देखील उमेदवारांच्या भेटीगाठीचा सिलसिला थांबविल्याचे चित्र गोंडपिपरी तालुक्यात बघावयास मिळत आहे. आरक्षण बदलणार या भीतीपोटी उमेदवारांनी मतदारांना साद घालणे थांबविले आहे.






