मंत्री चंद्रकांत पाटील (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: हवामान बदलाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांचा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी पुण्यात सत्कार करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, युनिसेफ महाराष्ट्र, अॅक्वाडॅम आणि सीईई यांच्या सहकार्याने “राज्यस्तरीय पाणी संवर्धन उत्कृष्ट पुरस्कार समारंभ” सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विविध महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय पाणी संवर्धन कार्याचे कौतुक केले.
महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांनी २०२३ पासून “यूथ एंगेजमेंट अँड वॉटर स्टुअर्डशिप (YEWS)” ही राज्यव्यापी मोहिम राबवली आहे. या उपक्रमांतर्गत १३ जिल्ह्यांतील १,५०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये ग्रीन क्लब स्थापन करून वैयक्तिक, संस्थात्मक आणि सामुदायिक स्तरावर पाणी बचतीचे उपक्रम राबवले गेले आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,“तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन हे व्यापक सामाजिक बदल घडवण्यासाठी महत्त्वाचे असते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे वारसदार असलेले आजचे युवक शास्त्रीय ज्ञान आणि ठोस कृतीतून हवामान बदलासारख्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत हे निश्चितच उत्साहवर्धक आहे.”
कोथरुडमधील रस्ते अन् पाणी प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील आक्रमक; पुढील आठवड्यात…
विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात गळणारे नळ दुरुस्त करणे, आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे, दात घासताना किंवा दाढी करताना पाणी न वाहू देणे असे उपाय केले. संस्था स्तरावर पावसाचे पाणी साठवणे तर काही गावांमध्ये सोक पिट्स आणि रिचार्ज पिट्स तयार करणे अशा उपक्रमांची अंमलबजावणी झाली आहे.
उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळणकर म्हणाले, “तरुणांना शाश्वत उपक्रमांसाठी सक्षम बनवणे हे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी अत्यावश्यक आहे. या पुरस्कारांमुळे केवळ त्यांच्या प्रयत्नांचा गौरव होत नाही तर संपूर्ण राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पाणी संवर्धनासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते.” ऑगस्ट २०२३ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत ७,९१,००० विद्यार्थ्यांनी दैनंदिन सवयींमध्ये बदल करून एकत्रितपणे सुमारे २५.८ दशलक्ष घनमीटर पाणी वाचवले आहे. ही माहिती “Why Waste YEWS” या खास मोबाईल अॅपद्वारे नोंदवण्यात आली.
याशिवाय, राज्य सरकारने सर्व विद्यार्थ्यांसाठी MahaYouthNet (https://www.mahayouthnet.in/) या पोर्टलवर ऑनलाइन सेल्फ-पेस्ड कोर्स सुरू केला. अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाला दोन क्रेडिटचा विषय म्हणून समाविष्ट करण्यात आले. आतापर्यंत २,२५,३७८ विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये प्रवेश घेतला असून १,३१,२९१ विद्यार्थ्यांनी हवामान बदल व पाणी व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
शैक्षणिक वर्ष २०२३–२४ मधील उपक्रमांच्या मूल्यमापनाच्या आधारावर तीन गटात पुरस्कार प्रदान करण्यात आले – “सर्वोत्कृष्ट ग्रीन क्लब”, “पाणी संवर्धनावर सर्वोत्तम पोस्टर” आणि “पाणी बचतीवर सर्वोत्तम शॉर्ट व्हिडीओ/रील”. प्रत्येक गटात पाच राज्यस्तरीय व तीन जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यासाठी निवडलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स आणि विद्यार्थी उपस्थित होते. अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
सहभागी संस्था व मान्यवर
हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, नॅशनल सर्व्हिस स्कीम (एनएसएस), युनिसेफ महाराष्ट्र, अॅक्वाडॅम, सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन (सीईई), वाय वेस्ट आणि युवक नेटवर्क यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या राबवण्यात आला.