पुणे: मॉडेल कॉलनीतील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट व जैन मंदीर गहाण प्रकरणी सुरू असलेल्या वादग्रस्त प्रकरणात, महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी दिलेला “स्टेटस को ” (सध्यस्थिती कायम ठेवण्याचा) आदेश ३० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आला आहे.
यापुर्वी, २० ऑक्टोबरला दिलेल्या प्राथमिक आदेशानुसार, ट्रस्टच्या मालमत्तेबाबत कोणतीही नवीन कारवाई किंवा बदल होऊ नये, असे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाची मुदत आज संपत आल्याने, अर्जदारांच्या विनंतीनुसार धर्मादाय आयुक्तांनी तो पुढे वाढवण्याचा निर्णय घेतला.
या सुनावणीदरम्यान अर्जदारांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी बाजू मांडली. तर प्रतिवादी ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क एलएलपी यांच्या वतीने अनुक्रमे ॲड. इशान कोल्हटकर आणि ॲड. एन. एस. आनंद उपस्थित होते. दोन्ही प्रतिवादींनी “स्टेटस को” आदेश वाढविण्याला कोणतीही हरकत घेतली नाही, याची नोंदही करण्यात आली.
धर्मादाय आयुक्तांनी दोन्ही प्रतिवादी पक्षांना त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली आहे. सेठ हिराचंद नेमचंद (एचएनडी) स्मारक ट्रस्ट हा जुना आणि प्रतिष्ठित ट्रस्ट असून, त्याच्या मालमत्तेच्या वापर व व्यवस्थापनाबाबत अलीकडच्या काळात वाद उद्भवला आहे. अर्जदारांनी काही व्यवहार आणि निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याने धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.






