जळगाव-संभाजीनगर महामार्गावर '३डी लेझर स्कॅनर'ची नजर! (Phoro Credit - AI)
सिल्लोड (वा.)/छत्रपती संभाजीनगर: देशभरातील राष्ट्रीय महामार्गांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. देशातील २३ राज्यांमधील २०,९०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, तडे आणि रस्त्याचे दोष शोधण्यासाठी ‘थ्री-डी लेझर-आधारित नेटवर्क सर्व्हे व्हिकल्स’ (NSV) तैनात करण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेत महाराष्ट्रातील एनएच-७५३एफ (जळगाव-छत्रपती संभाजीनगर) महामार्गाचा समावेश आहे. ‘भारतमाला परियोजने’अंतर्गत रस्त्यांच्या गुणवत्तेचे AI-आधारित विश्लेषण केले जाईल. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महामार्गावरील दुरुस्ती जलद होईल आणि अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
एनएच-७५३एफ हा २०५ किमी लांबीचा महामार्ग जळगावपासून अजिंठा, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरमार्गे पुणे आणि माणगावपर्यंत विस्तारलेला आहे. हा महामार्ग मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र यांना जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे, जिथे दररोज २०,००० हून अधिक लहान व मोठी वाहने धावतात. सप्टेंबर २०२५ च्या अहवालानुसार, जळगाव-पालधी पट्ट्यात ६ ब्लॅक स्पॉट्स (अपघातप्रवण ठिकाणे) ओळखली गेली आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असले तरी, पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल तक्रारी वाढल्या आहेत.
एनएच-७५३एफ (छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्ग) वरील अपघातप्रवण क्षेत्रे
एनएसव्ही वाहनांवर ३डी लेझर स्कॅनर, जीपीएस (GPS) आणि ॲक्सिलरोमीटर बसवलेले आहेत. हे स्कॅनर रस्त्याच्या प्रत्येक सेंटीमीटरची स्कॅनिंग करतात. ते खड्डे, तडे आणि उंचसखल भागांची अचूक ३डी प्रतिमा (3D Image) तयार करतात. हा डेटा NHAI च्या AI-आधारित ‘डेटा लेक’ (Data Lake) पोर्टलवर अपलोड होतो. येथे तज्ज्ञ विश्लेषण करून दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणांची प्राधान्यसूची तयार करतात. या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय रस्त्यावरील दोष त्वरित नोंद होतात, ज्यामुळे देखभाल खर्चात २०% पर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. रस्ता विकासापूर्वी आणि नंतर प्रत्येक सहा महिन्यांनी हे सर्वेक्षण केले जाईल.
अवघ्या 1230 रुपयांच्या बिलासाठी हॉटेलचालकाला तिघांची बेदम मारहाण; एकाने तर हातातील कड्याने…






